पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळाला आहे. मात्र, या निकालाचे महत्त्व केवळ विद्यापीठाच्या परिसरापुरते मर्यादित नसून त्याला व्यापक राजकीय संदर्भही प्राप्त झाला आहे.
अभाविपचे उमेदवार अंकित बिधान यांनी अध्यक्षपद कायम राखले. त्यांना शिरोमणी अकाली दलाच्या विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसओआय)चा पाठिंबा मिळाला. या पाठिंब्यामुळे निकालाला राजकीय परिमाण मिळाले असून २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी भाजप-अकाली दल युती पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे का, याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.
अंकित बिधान यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३,१४९ मते मिळवत विजय मिळवला. आम आदमी पक्षाशी संबंधित ‘आसप’चे उमेदवार आदिल बरार यांना २,६३७ मते मिळाली, तर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित एनएसयूआय समर्थित उमेदवार गुरमन सिंग सिद्धू २,२६३ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पंजाब विद्यापीठाच्या सर्वोच्च विद्यार्थी पदावर अभाविपचा हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या वर्षी अभाविपने अनेक दशकांपासून काँग्रेससमर्थित एनएसयूआय आणि प्रादेशिक विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व असलेल्या या विद्यापीठात अध्यक्षपद मिळवत आपली दीर्घ प्रतीक्षा संपवली होती.
अंतिम निकाल
अध्यक्ष: अंकित बिधान — अभाविप
उपाध्यक्ष: अरमान सिंग भिंदर — आसप
सचिव: ध्यान सिंग (समीर) — अपक्ष, एनएसयूआय समर्थित
सहसचिव: विशाल बामल — अपक्ष, आसपच्या आघाडीचा समर्थित
हे ही वाचा:
पुण्यात रिक्षा प्रवास महागला; किमान भाडे ३० रुपये
मुंबईत सीएनजी २ रुपये, तर पीएनजी १ रुपयाने महागले
मोदींसोबत पुतिन-जिनपिंग यांची दिलखुलास भेट; शहबाज शरीफ पाहतच राहिले
टाइम्स स्क्वेअरमध्ये चाकू हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात आरोपी महिला ठार
या निकालातून अभाविपचा संपूर्ण विजय झालेला नाही, हेही स्पष्ट झाले. अभाविपने अध्यक्षपद कायम ठेवले असले तरी उर्वरित तीन महत्त्वाची पदे प्रतिस्पर्धी गटांनी जिंकली आहेत. यंदाच्या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा म्हणजे अभाविपला मिळालेला शिरोमणी अकाली दलाच्या विद्यार्थी शाखेचा पाठिंबा. पंजाब विद्यापीठाच्या निवडणुकीत एसओआय पारंपरिकपणे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आली आहे. मात्र, यंदा त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाल्यानंतर संघटनेने अंकित बिधान यांना पाठिंबा दिला.
या पाठिंब्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून त्यामुळे भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. २०२०मध्ये कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमधील दीर्घकाळाची युती तुटली होती. आता पंजाबमध्ये २०२७मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने विद्यार्थी संघटनांमधील हा स्थानिक पातळीवरील समझोता देखील राजकीयदृष्ट्या बारकाईने पाहिला जाण्याची शक्यता आहे.
भाजपसाठी हा निकाल अशा वेळी महत्त्वाचा ठरला आहे, जेव्हा तरुण मतदारांमधील पक्षाच्या प्रभावाबाबत चर्चा सुरू आहे.‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधात मोठी राजकीय चर्चा निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे विरोधी विद्यार्थी संघटनांना निवडणूक प्रचारादरम्यान भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली.
या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली विद्यापीठांपैकी एका पंजाब विद्यापीठात अभाविपला मिळालेला विजय भाजपसाठी वेगळा राजकीय संदेश देणारा ठरला आहे.
