भारतीय हवाई दलाच्या नव्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी निवृत्त होणार असून, त्यानंतर आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाची सूत्रे स्वीकारतील. ते हवाई दलाचे २९वे प्रमुख ठरणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना एअर चीफ मार्शल हा चार ताऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल होणार आहे.
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांना हवाई दलातील दीर्घ आणि विविधांगी अनुभव आहे. ते प्रायोगिक चाचणी वैमानिक तसेच प्रशिक्षित उड्डाण प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध प्रकारच्या विमानांवर तब्बल ३,५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव मिळवला आहे. हवाई दलातील कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे कमांडर-इन-चीफ, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफमधील वरिष्ठ अधिकारी आणि सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून त्यांनी काम केले आहे. या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना देशाच्या सामरिक सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक अनुभव मिळाला आहे.
हे ही वाचा:
पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयावर सीबीआयचा छापा
रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून तरुणाचा मृत्यू
मुंबई सेंट्रल मंडळात स्वच्छता पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान
होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी
आशुतोष दीक्षित यांच्यासमोर हवाई दलाची धुरा अशा वेळी येत आहे, जेव्हा भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. लढाऊ विमानांची संख्या वाढवणे, अत्याधुनिक विमाने आणि संरक्षण प्रणाली हवाई दलात समाविष्ट करणे, ड्रोन आणि नव्या युद्धतंत्राचा प्रभावी वापर करणे तसेच भविष्यातील आव्हानांसाठी जवानांना सज्ज ठेवणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. बदलत्या सुरक्षा परिस्थितीत हवाई दलाची क्षमता अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ३१ ऑक्टोबरपासून आशुतोष दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाला आणि सामरिक क्षमतेच्या विस्ताराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
