मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी हे दिल्लीतल्या आकाशवाणी भवनात जवळपास ८-९ तास धरणे धरून बसले होते, पण अखेर दिल्ली पोलिसांनी रात्री ८ वाजता कारवाई करत राहुल गांधी, प्रियांका वड्रा आणि इतर काँग्रेस खासदार, नेत्यांना उचलण्यात आले. त्यावेळी पोलिस आणि गांधी भावंडांमध्ये संघर्षही पाहायला मिळाला. प्रियांका वड्रा यांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही पाहायला मिळत होते.
दिल्लीत त्यांच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. मोर्चा रोखण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी जबरदस्तीने आकाशवाणी भवन परिसरात प्रवेश करत तब्बल साडे सात तास ठिय्या मांडला. गाद्या, चादरी घेऊन राहुल गांधी त्यावरच बसले आणि त्यांनी अडवणुकीचा मार्ग स्वीकारला. पण अखेर हा सगळ्या जामानिमा पोलिसांनी उचलला. राहुल गांधींना पोलिसांनी उचलून बाहेर नेत गाडीत कोंबले. प्रियांका वड्रा यांना एका व्हॅनमध्ये बसवण्यात आले होते. पण त्या पुन्हा बाहेर पडल्या आणि त्यांनी पोलिसांशी वाद घातला. मात्र तरीही त्यांना महिला पोलिसांनी दुसऱ्या गाडीकडे नेले. राहुल गांधी हे बसमध्ये बसलेले असताना खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना बाहेर येऊ दिले नाही.
राहुल गांधी हे सकाळी आकाशवाणी भवनकडे काढण्यात आलेल्या आंदोलनानंतर ज्ञानेशकुमार यांची भेट घेण्यास इच्छुक होते. तिथेच निवडणूक आयोगाचे मुख्यालय आहे. पण तशी कोणतीही भेट झाली नाही. १२ वाजल्यापासून ते आणि प्रियांका वड्रा तसेच इतर काही नेते, प्रवक्ते हे आकाशवाणी भवनात शिरले पण बाकी कार्यकर्त्यांना बाहेरच ठेवण्यात आले. त्यांना तेव्हाच उचलण्यात आले. पण राहुल गांधी मात्र आतमध्ये बसून राहिले. प्रियांका वड्रा यांच्यासह ते वडाच्या झाडाखाली बसून होते. तिथेच त्यांचे खानपान सुरू होते. नंतर संध्याकाळी तिथे गाद्या, चादरी आणण्यात आल्या. तेव्हा रात्रभर त्यांचा मुक्काम तिथेच असणार की काय असे वाटत असताना रात्री ८ वाजता पोलिसांनी सगळा भाग ताब्यात घेतला आणि काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
महिलांच्या सायबर छळावर तातडीने कारवाई करा
पराभवाच्या नैराश्येतून काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांची बदनामी
हरमनप्रीत कौरने सोडले कर्णधारपद
फॉर्म ६ बाबत राहुल गांधींच्या आरोपांची संबित पात्रांनी केली पोलखोल
राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’च्या आरोपांचा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मोहन भागवत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप केला. या प्रकरणात जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. इंडी आघाडीच्या सुमारे ३०० खासदारांनी संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. निवडणूक आयोग विरोधी खासदारांची भेट का घेत नाही आणि पोलिसांकडून मोर्चा का रोखला जात आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ‘आम्ही देशातील कोट्यवधी नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. मग निवडणूक आयोग आमच्याशी चर्चा का करत नाही?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र, विरोधी खासदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कोणत्याही विरोधी पक्षाकडून बैठकीची विनंती आलेली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणारा मोर्चा निती आयोगाजवळ पोलिसांनी रोखला. यावेळी राहुल गांधी बॅरिकेडवर चढले आणि हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही अन्य विरोधी पक्षांचे नेते आकाशवाणी भवन परिसरात पोहोचले. तिथे राहुल गांधी यांनी सात तास ठिय्या मांडला.
या आंदोलनादरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांच्यासह काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा रोखल्यानंतर विरोधी खासदारांनी ‘व्होट चोरी’ आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
