अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताच्या तपासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख ‘मफलर मॅन’ असा केला होता. या आरोपांना आता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले असून, रोहित पवार यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
नवनाथ बन यांनी केलेल्या दाव्यानुसार, अजित पवार यांच्या विमान अपघातात सहभागी असलेल्या त्याच विमानातून रोहित पवार यांनीही प्रवास केला होता. विशेष म्हणजे, १० डिसेंबर २०२५ रोजी अजित पवार आणि रोहित पवार यांनी दिल्ली ते नागपूर असा एकत्र प्रवास केला होता. हा प्रवास व्हीएसआर कंपनीच्या विमानातून झाल्याचा दावा बन यांनी केला आहे. या विमानाचे पायलट सुमित कपूर आणि सहवैमानिक शांभवी होते. अपघाताच्या वेळीही याच विमानाचे हेच वैमानिक असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात विमानाच्या तिकिटाची माहिती उपलब्ध असल्याचेही बन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ
परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?
पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास
अमेरिकेच्या शेअर बाजारात एआय कंपन्यांना मोठा झटका
नवनाथ बन यांनी पुढे असा सवाल उपस्थित केला की, रोहित पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत आपण व्हीएसआर कंपनीच्या विमानातून कधीही प्रवास केला नसल्याचे सांगितले होते. मग आता समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी त्याच कंपनीच्या विमानातून अजित पवार यांच्यासोबत प्रवास केला असेल, तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. दिल्ली ते नागपूर प्रवास कोणत्या कारणासाठी केला होता आणि त्यासाठी व्हीएसआर कंपनीचेच विमान का निवडले, याची उत्तरे त्यांनी द्यावीत, अशी मागणी बन यांनी केली. रोहित पवार सातत्याने संशयाचे वातावरण निर्माण करत असून, त्यांनी केलेल्या विधानांबाबत स्पष्टता देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून रोहित पवार यांनी यापूर्वीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हीएसआर कंपनी आणि तिच्या मालकांशी संबंधित राजकीय संबंधांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. दुसरीकडे, भाजपने त्यांच्या आरोपांना राजकीय प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि विमान अपघात तपास यंत्रणांकडून सुरू आहे. त्यामुळे नवनाथ बन यांनी केलेल्या नव्या दाव्यांवर रोहित पवार काय भूमिका मांडतात आणि या विमान प्रवासासंदर्भातील माहितीची अधिकृत पडताळणी काय होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
