घरसंपादकीयकाँग्रेसचे आता लांगुलचालनाचे नवे ‘टेंडर’

काँग्रेसचे आता लांगुलचालनाचे नवे ‘टेंडर’

मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मतांसाठी काहीही करण्याची तयारी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष करू शकतो. अशी असंख्य उदाहरणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण पाहात आलो आहोत. त्यातून आपण देशातील वेगळे नागरीक आहोत, ही भावना मुस्लिमांमध्ये वाढविण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे मते हवी असतील तर आम्हाला सवलती द्या, आमच्यासाठी वेगळ्या योजना आखा, नाहीतर मते मिळणार नाही, असा एक प्रघात पडत गेला. त्याला मग अनेक पक्ष बळी पडत गेले किंबहुना, ते लांगुलचालन करतच त्या पक्षांची वाटचाल होत राहिली. त्यातच त्यांना धन्यता वाटू लागली.

जिथे काँग्रेसची सरकारे असतील तिथे मग या लांगुलचालनाला एक खास दर्जा प्राप्त झाला. कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचे सरकार आहे. डी. के. शिवकुमार हे तिथले मुख्यमंत्री. या राज्यात असलेल्या अल्पसंख्य आयोगाने २ नोव्हेंबरला एक जाहिरात प्रसिद्ध केली. ती टेंडर नोटीस होती. ज्यात अल्पसंख्य मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी लष्कराचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेविषयी माहिती देण्यात आली होती. जे त्यासंदर्भातील टेंडर भरू इच्छितात त्यांच्यासाठी मुदत वगैरे देण्यात आली होती. नंतर मात्र काँग्रेस सरकारने म्हणा किंवा अल्पसंख्य आयोगाने सारवासारव करताना शब्दांची फेरफार झाली, शब्द चुकले असा दावा करत हात वर करण्याचा प्रयत्न केला.

एका सरकारी अधिकाऱ्याने यावर म्हटले होते की, शब्दांमध्ये काहीतरी चूक झाली. लष्करात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन, प्रशिक्षण मिळावे यासाठी ही नोटीस काढण्यात आली. खरे तर ही सारवासारवच आहे. शब्दांमध्ये चूक समजण्यासारखी असते आणि इथे काही १००-१५० पानी काही जाहिरात द्यायची नाही. चार ओळींच्या जाहिरातीत एवढी मोठी चूक होते याचा अर्थ ती चूक नसून मूळ उद्देश तोच असतो असाच त्याचा अर्थ काढता येतो.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनचा भारताला शह देण्याचा प्रयत्न

कर्नाटक अल्पसंख्य विभाग देणार मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण

सात्विक-चिरागची कडवी झुंज अपयशी; अंतिम फेरी हुकली!

कर्नाटक अल्पसंख्य विभाग देणार मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण

त्यामुळे उद्देश मुस्लिम तरुणांना लष्करी प्रशिक्षण देणे हाच असला पाहिजे असे धरूनच त्याविषयी बोलावे लागते. मुळात असे प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संस्था आहेत, जिथे तुमच्या शारीरिक आणि बौद्धिक कौशल्याच्या निकषावर भर्ती होता येते. तिथे सगळ्यांना प्रवेश आहे. तिथे कोणत्याही जाती धर्माच्या आधारावर प्रशिक्षण दिले जात नाही, प्रवेश दिला जात नाही. केवळ आणि केवळ शारीरिक क्षमता, बौद्धिक कसोटी या आधारेच तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. त्यात तुम्ही नापास ठरलात तर पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यासाठी विविध स्तरावर मार्गदर्शनही केले जाते. त्यातूनही अल्पसंख्याक मुले हे मार्गदर्शन मिळवू शकतात. काही लोक यावर असा युक्तिवाद करतात की, ओबीसी वर्गासाठी असे स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग असतात मग अल्पसंख्याकांसाठी का असू नये. असे कोणतेही स्वतंत्र वर्ग केले जात असतील तर त्यावर बंदीच असली पाहिजे. लष्करात किंवा सैन्यदलांमध्ये प्रवेश घेणारा आपण ओबीसी, अल्पसंख्य आहोत, या भावनेने प्रवेश घेताच कामा नये. त्यामुळे अशी कुणी मार्गदर्शन केंद्रे चालवत असतील तर त्यावर ताबडतोब बंदी घातली गेली पाहिजे.
मुळात कॉलेजेसमध्ये नॅशनल कॅडेट कोरच्या माध्यमातून मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाते. त्यातून लष्करी शिस्त, गणवेशाचे भान, देशप्रेम याविषयी आपसूकच देशभावना निर्माण केली जाते. त्यात उलट सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यातून लष्करातील भर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकता येईल.

या एकूणच टेंडरबाबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून विचारले आहे की, कर्नाटकच्या अल्पसंख्याक विकास विभागाने मुस्लिम तरुणांसाठी ६० दिवसांच्या लष्करी प्रशिक्षणाची निविदा काढली आहे. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस पक्ष मुस्लिमांना कोणाशी लढण्यासाठी सज्ज करतोय? फक्त मुस्लिम तरुणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे कारण काय? कर्नाटक सरकारने उचललेल्या या पावलाबद्दल प्रचंड ओरड झाली आणि त्यानंतर टिपू सुलतानच्या या वारसांनी मूळ निविदेत शब्दांची चूक झाल्याचे सांगत माघारीची भूमिका घेतली. परंतु ‘बुंद से गई वो हौद से नही आती’. काँग्रेसवाले आता उघड उघड देशद्रोही भूमिका घेत आहेत.

आमदार भातखळकर यांनी काँग्रेसला टिपू सुलतानाचे वारसदार म्हटले आहे तेही खरेच आहे. तोही लांगुलचालनाचा एक प्रकार आहे. ज्याबद्दल काँग्रेस नेत्यांना विशेष आस्था आहे. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनीही टिपू सुलतानाच्या फोटोपुढे फुले अर्पण केल्याचे समोर आले होते. त्यावरून बरीच टीका झाली. त्यावेळी अमित देशमुख यांनी टिपू सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श असल्याचे म्हटले होते. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर टिपू सुलतान हा तोलामोलाचा आदर्श असूच शकत नाही. टिपू सुलतानाने कुठल्या स्वराज्याची निर्मिती केली नाही उलट हिंदूंवर अनन्वित अत्याचारच केले. त्याच्यावर स्तुतीसुमने उधळण्याची गरजच काय? हिंदूंचे शिवाजी महाराज असतील तर मुस्लिमांना पण आदर्श असावा म्हणून टिपू सुलतानचे नाव पुढे करण्याचा हा उफराटा प्रकार आहे. मुळात महाराष्ट्रात टिपू सुलतानाचे कामच काय? कर्नाटकमध्ये मुस्लिमांसाठी लष्कराचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा जो प्रकार आहे, त्याचीच एक आवृत्ती म्हणजे टिपू सुलतानचे उदात्तीकरण. मालेगावमध्ये तर तेथील महापौरांनी फक्त टिपू सुलतानाचे छायाचित्र भिंतीवर लावले. ज्यांना महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो न लावता टिपूचा फोटो लावावासा वाटतो, त्याबद्दल काय म्हणणार? मुस्लिम लांगुलचालनासाठी टिपूच्या आरत्या ओवाळणारे जसे आहेत, तसेच मुस्लिमांना वेगळे लष्करी प्रशिक्षण देणारेही आहेत, हेच यातून दिसते.

मुस्लिम हे बाकी समाजापेक्षा वेगळे आहेत, त्यांना वेगळे काहीतरी मार्गदर्शन, प्रशिक्षण मिळाले पाहिजे, अशी भावनाच मुळात देशात विभाजन करणारी आहे. त्यामुळे ती पटणारी नाही. बरे आता जरी सारवासारव केली जात असली तरी असे स्वतंत्र लष्करी प्रशिक्षण देण्याचा हेतू असणार नाही, यावर विश्वास कसा काय ठेवायचा. अशा मार्गदर्शन केंद्रात नेमके काय चालले आहे, यावर कुणाचा अंकुश असणार? त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले गेले तर त्यात चुकीचे काय?

आताच एक क्रिकेटच्या संदर्भात घटना घडली त्याकडे लक्ष वेधावे लागेल. भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. त्यात भारतीय संघात मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजाची निवड झाली नाही, त्यावरून टीकाही झाली. पण ती क्रिकेटच्या परिप्रेक्ष्यात ठीक आहे. मात्र उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी कहरच केला. ते म्हणाले की, तो मोहम्मद सिराज आहे, म्हणून त्याला वगळण्यात आले. याचा सरळ सरळ अर्थ हाच होता की, तो मुस्लिम असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला. इम्रान मसूद यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार. आपण मुस्लिम खासदार नाही तर आपण देशाचे खासदार आहोत, हा फरकच ज्यांना कळत नाही, ते अशी विधाने करणारच. अनेक असे मुस्लिम लोकप्रतिनिधी आहेत, जे आपण मुस्लिम लोकप्रतिनिधी आहोत अशा थाटात वावरतात, त्यांना आपण सर्वसमावेशक भूमिका घ्यावी असे कधी वाटत नाही. आपण प्रथम मुस्लिम आहोत, असाच भाव त्यांच्या वागण्यात वारंवार दिसून येतो. इम्रान मसूद यांच्या विधानातून तेच दिसून येते.

मुळात कोणत्याही क्रीडाप्रकारात अशी धर्माच्या, जातीच्या आधारावर निवड होत नाही. त्यासाठी तुम्हाला कौशल्य सिद्ध करावे लागते. ते असेल तर मग कोणतीही जात, धर्म आड येत नाही. पण मसूद यांनी हे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. एकप्रकारे त्यांनी मुस्लिम समाजातील अनेकांच्या मनात हे विष कालवले की, आपण वेगळे आहोत, आपल्यावर अशा प्रकारे अन्याय होतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात खरे तर मसूद यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. त्यांना संसदेत जाब विचारला गेला पाहिजे. एरवी जातीभेद, धार्मिक भेदाभेदावर सगळ्यांना लेक्चर देणारे हे नेते स्वतः मात्र धार्मिक भेद कसा निर्माण करतात याचे हे ताजे उदाहरण म्हणता येईल.

त्यामुळे लष्करी प्रशिक्षणाच्या बाबतीतही असाच भेदभाव करण्याचा प्रयत्न असणार नाही, असे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. काँग्रेसचे सरकार असल्यामुळे असली थेरं करायला पूर्ण मोकळीक आहे, असा काहीजण अर्थ काढून कामाला लागलेले असतात. या सगळ्या उदाहरणांसंदर्भात काँग्रेसची कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. क्रिकेटपटूबद्दल मसूद यांनी केलेल्या विधानांचे काँग्रेसकडून खंडन व्हायला हवे होते. त्यांना समज दिली जायला हवी होती, पण तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे अशा सगळ्या प्रकारांना काँग्रेसची फूस आहे हेच यातून स्पष्ट होते. एकूणच मुस्लिम लांगुलचालनासाठी काँग्रेसकडून कधी टिपू सुलतानच्या, कधी क्रिकेटपटूच्या धर्माच्या आधारावर तर कधी मुस्लिमांसाठी स्वतंत्र लष्करी प्रशिक्षणाच्या हेतूने टेंडर निघतच राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version