तामिळनाडूमधील कार्तिगाई दीपम उत्सवावरून मदुराईमध्ये राजकीय आणि धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने थिरुपरंकुंद्रम टेकडीवरील दगडी स्तंभावर २४ नोव्हेंबर रोजी दिवा लावण्यास परवानगी दिली. मात्र, या आदेशाच्या अंमलबजावणीवरून राज्य सरकार आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांच्यासह सुमारे ७५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, संभाव्य तणाव लक्षात घेऊन मदुराईमध्ये ५,६१८ पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवा लावला जात आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी थिरुपरंकुंद्रम येथे जाणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त तैनात करून त्यांना घरातच रोखल्याचा आरोप पक्षाने केला आहे. भाजपच्या माहितीनुसार, दक्षिण तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये पक्षाचे आणि हिंदू मुन्नानी संघटनेचे सुमारे ७५० पदाधिकारी नजरकैदेत आहेत.
मदुराई प्रशासनाने २३ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २५ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक सभा, मोर्चे, निदर्शने आणि परवानगीशिवाय टेकडीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. टेकडी परिसरात ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ड्रोन उडवण्यावरही निर्बंध आहेत.
हे ही वाचा:
पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात
विधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती
पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस
पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?
सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय?
थिरुपरंकुंद्रम टेकडीवरील दीपथून स्तंभ हा सिकंदर बादुशा दर्ग्याजवळ आहे. या ठिकाणी दिवा लावण्याच्या परंपरेवरून २०२५ पासून वाद सुरू आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबरला या स्तंभावर दिवा लावण्यास एकदाच अंतरिम परवानगी दिली. या निर्णयामुळे भविष्यात कायमस्वरूपी धार्मिक हक्क किंवा जागेच्या मालकीबाबत कोणताही निर्णय होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यामुळे दिवा लावण्याच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला.
