मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला परवानगी न मिळाल्याचा दावा ‘कॉकरोच जनता पार्टी’चा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके याने केला आहे. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेवर त्याने आक्षेप घेतला असून, नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे. तसेच, आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्याने दिला आहे.
अभिजीत दीपके याने सोशल मीडिया पोस्टद्वारे मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाबाबत भूमिका मांडली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचा दावा आहे. परवानगी न देण्याच्या निर्णयावर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून आंदोलनाला परवानगी न देणे म्हणजे नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे दीपकेने म्हटले आहे. आंदोलनाला परवानगी मिळाली नाही, तर सीजेपीच्या वतीने गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये दिला आहे.
मुंबई पोलिसांची भूमिका
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. शिवाजी पार्कमध्ये कोणत्याही सभा किंवा आंदोलनाला परवानगी देण्याचा अधिकार मुंबई पोलिसांकडे नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यासाठी पोलिसांनी २०१३ मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आणि २०१६ मधील महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचा हवाला दिला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला परवानगी न देण्यामागे पोलिसांचा स्वतंत्र निर्णय नसल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
इराणने होर्मुझमध्ये अमेरिकन पाण्याखालील ड्रोन पकडला
दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल
उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या कारवाईवरून राडा; पोलिसांवर दगडफेक
बोईंग ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील अर्जदार अजिंक्य शिंदे यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी शिवाजी पार्कऐवजी मुंबई शहरातील अन्य ठिकाणी आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, दुसऱ्या ठिकाणी आंदोलनासाठी परवानगी घेण्यासाठी आवश्यक अर्ज साद करण्यास सांगितले आहे. दुसऱ्या ठिकाणासाठी अर्ज मिळाल्यानंतर नियमांनुसार त्यावर विचार केला जाईल, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
