उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रबुपुरा परिसरातील नागला श्री पदम गावात ही घटना घडली. महेश, त्यांची पत्नी ललिता आणि त्यांची तीन मुले अशी मृतांची ओळख पटली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर सर्वजण झोपायला गेले; मात्र शनिवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. एकाच रात्री संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा:
जंतर-मंतर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी
जुनागढमध्ये संशयित बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात
बांगलादेशात समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला भीषण आग
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजावर हल्ला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले असून, अन्न सुरक्षा विभागाकडूनही तपासणी करण्यात आली. कुटुंबाने रात्री खाल्लेल्या नूडल्समुळे अन्नविषबाधा झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, केवळ नूडल्स खाल्ल्यामुळेच मृत्यू झाला, असे अद्याप निश्चित झालेले नाही. खाद्यपदार्थांची स्थिती, संभाव्य विषबाधा आणि मृत्यूमागील अन्य कारणे यांची तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.
या प्रकरणातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे एकाच कुटुंबातील पाच जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता विचारात घेऊन तपास सुरू आहे. त्यामुळे ही घटना अन्नविषबाधेची आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याचे उत्तर तपासानंतरच मिळणार आहे. एका कुटुंबातील पाच जणांचा अशा प्रकारे झालेला मृत्यू हा केवळ दुर्दैवी प्रकार नसून, नागरिकांच्या मनात अन्नसुरक्षेबाबतही चिंता निर्माण करणारी घटना ठरली आहे.
