भारताच्या धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत पुढील पाच दशकांत हळूहळू बदल होण्याचा अंदाज आहे. मात्र, २०७० पर्यंतही भारत हिंदूबहुल देशच राहणार असून, हिंदूंची एकूण लोकसंख्या वाढत राहील, असे प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या अभ्यासात म्हटले आहे. या काळात मुस्लिम लोकसंख्येचा वाटा वाढणार असला, तरी हिंदूंची संख्या मुस्लिमांपेक्षा अधिक राहील. या बदलामागे धर्मांतरापेक्षा दोन्ही समुदायांमधील वय आणि प्रजनन दरातील फरक प्रमुख कारण असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालानुसार, २०२० मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचा वाटा ७९ टक्के होता. २०७० पर्यंत तो ७६ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, मुस्लिम लोकसंख्येचा वाटा १५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. मात्र, याच काळात भारतातील हिंदू लोकसंख्या सुमारे १७.६ कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये भारतीय मुस्लिमांचे सरासरी वय २४ वर्षे, तर हिंदूंचे २९ वर्षे होते. तसेच, २०२५ ते २०३० दरम्यान मुस्लिम महिलांचा सरासरी प्रजनन दर २.३, तर हिंदू महिलांचा १.८ असण्याचा अंदाज आहे. मात्र, दोन्ही समुदायांमधील प्रजनन दरातील अंतर सातत्याने कमी होत आहे. १९९२ मध्ये हे अंतर प्रति स्त्री एकापेक्षा अधिक अपत्यांचे होते; अलीकडच्या काळात ते सुमारे अर्ध्या अपत्यापर्यंत आले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याचा दावा सिद्ध करणारा पुरावा नसल्याचेही लोकसंख्याशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
भारताच्या पलीकडेही जागतिक धार्मिक रचनेत महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. प्यूच्या अंदाजानुसार, २०३५ पर्यंत मुस्लिम ख्रिश्चनांना मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला धार्मिक गट बनू शकतात. २०७० पर्यंत मुस्लिमांची संख्या ३.६४ अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये ही संख्या २.०२ अब्ज होती. जागतिक लोकसंख्येतील त्यांचा वाटा २६ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. दुसरीकडे, ख्रिश्चनांची संख्या तीन अब्जांपेक्षा थोडी कमी राहण्याचा अंदाज आहे.
आफ्रिकेत ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढण्याचा अंदाज
ख्रिश्चन धर्माचे भौगोलिक केंद्रही बदलण्याची शक्यता आहे. सध्या युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात असलेली ख्रिश्चन लोकसंख्या भविष्यात उप-सहारा आफ्रिकेत अधिक केंद्रित होईल. २०२० मध्ये जगातील ३१ टक्के ख्रिश्चन या भागात राहत होते. २०७० पर्यंत हे प्रमाण निम्म्याहून अधिक होऊ शकते. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा अमेरिकेला मागे टाकून सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला देश बनण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा:
इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी
GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा
ट्रम्प यांच्या पक्षाला पैसा पुरवणे मूर्खपणा
जगाला वेड लावणाऱ्या ‘GTA 6’च्या निर्मितीत १,६०० भारतीयांचा हात
याउलट, युरोपमध्ये ख्रिश्चनांचा जागतिक लोकसंख्येतील वाटा २०२० मधील २२ टक्क्यांवरून २०७० मध्ये ११ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये कोणत्याही धर्माशी संलग्न नसलेले लोक बहुसंख्य होऊ शकतात. चीन, जपान आणि दक्षिण कोरियातील वृद्ध व घटत्या लोकसंख्येमुळे बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्याही कमी होण्याचा अंदाज आहे.
