गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. विशेषतः रायगडमधील माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा फटका वाहनचालकांना बसत आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही वाहनचालकांना बराच वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
हे ही वाचा:
आता क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही
आयफोन १८ प्रोची आजपासून प्री-बुकिंग
दक्षिण कोरियाला ५-१ ने लोळवत भारताची फायनलमध्ये दिमाखात एंट्री
‘आम्ही साऱ्या भाग्यवान’ म्हणत महिलांनी काढला मोदींसोबत फोटो
दरम्यान, महामार्गावरील वाढत्या वाहनसंख्येचा परिणाम पेट्रोल पंपांवरही दिसून येत आहे. कोकणाकडे रवाना होण्यापूर्वी वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी या रांगा महामार्गापर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्यातच काही भागांत अपुरा रस्ता, सुरू असलेली कामे, बाजारपेठांमधील गर्दी आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे.
गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांत प्रशासनासमोरील आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वाहनचालकांनीही संयम बाळगणे गरजेचे आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनात पुरेसे इंधन भरून घेणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि गर्दीच्या वेळेत प्रवास टाळणे, यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
