घरविशेषमदर डेअरी, 'अमूल' दूध महागले

मदर डेअरी, ‘अमूल’ दूध महागले

गुरुवारपासून नवे दर लागू होणार

अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) देशभरातील प्रमुख ताज्या पिशवीबंद दूध प्रकारांच्या दरात सुमारे ४ ते ५ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. गुरुवारपासून सुधारित दर लागू होणार आहेत. दरम्यान मदर डेअरी दुधाचे दरही वाढले आहेत.

सहकारी संस्थेच्या माहितीनुसार, सर्वाधिक विक्री होणाऱ्या अमूल ताजा टोन्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दुधामध्ये ३ टक्के दूध फॅट असते. दरवाढीनंतर या दुधाच्या किमतीत ३.३ टक्क्यांची वाढ होणार आहे. तर ६ टक्के दूध फॅट असलेल्या अमूल गोल्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अमूल गोल्डच्या दरात ५.५ टक्क्यांची वाढ होणार आहे.

मदर डेअरीनेही ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बल्क व्हेंडिंग मशीनमधून मिळणाऱ्या टोन्ड दुधाचा दर ५८ रुपयांवरून ६० रुपये झाला आहे. फुल क्रीम पॅकबंद दूध ७२ रुपयांऐवजी ७६ रुपये प्रति लिटर मिळेल. पॅकबंद टोन्ड दुधाचा दर ६० वरून ६२ रुपये झाला आहे. डबल टोन्ड दूध ५४ वरून ५६ रुपये, तर गायीचे दूध ६२ वरून ६५ रुपये झाले आहे. म्हशीच्या फुल क्रीम दुधाचा दर ८० वरून ८६ रुपये प्रति लिटर झाला आहे.

दुधाच्या उत्पादन आणि प्रक्रिया खर्चात लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खर्चात वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या किमतीत सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. त्याचवेळी दूध उत्पादकांना अधिक चांगला मोबदला मिळावा, याचीही काळजी घेण्यात आली आहे, असे जीसीएमएमएफने सांगितले.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवणार नाही

दिवा रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले

वैदिक मंत्रोच्चारात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नागरिक सरसावले; अडीच टन कचरा जमा

गेल्या वर्षभरात हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्याचे घटक असलेल्या तेलबियांची पेंड, मका आणि मळी यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्मचे दर आणि इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत, असे फेडरेशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पर्यावरणीय परिस्थितीमुळेही आव्हाने निर्माण झाली आहेत. विशेषतः गुजरात आणि देशातील अनेक भागांमध्ये कमी आणि असमान पावसामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरवाढीतील मोठा हिस्सा शेतकऱ्यांना 

जीसीएमएमएफने सांगितले की, त्यांच्या सदस्य संघटनांनी गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दूध खरेदी दरात आधीच ४ ते ५ टक्क्यांची वाढ केली आहे. ग्राहकांच्या दुधाच्या किमतीत करण्यात आलेल्या ताज्या वाढीमुळे दूध उत्पादकांना आणखी मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

अमूलच्या सहकारी रचनेतून ग्राहकांकडून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ८० टक्के रक्कम ३६ लाख दूध उत्पादकांना परत दिली जाते, असे फेडरेशनने स्पष्ट केले.

दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचा मोठा हिस्सा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यास त्यांना मदत होईल आणि अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही फेडरेशनने म्हटले आहे.

या दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील घरगुती खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः नियमितपणे पॅकेटबंद दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांवर याचा परिणाम होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version