घरविशेषरोनाल्डोचे दणक्यात पुनरागमन! युनायटेडने मारला गोल्सचा चौकार

रोनाल्डोचे दणक्यात पुनरागमन! युनायटेडने मारला गोल्सचा चौकार

शनिवार, ११ सप्टेंबरचा दिवस जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी घेऊन आला होता. इंग्लंडमधल्या प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डो पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसला. रोनाल्डोच्या पुनरागमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती आणि त्याने देखील चाहत्यांना निराश केले नाही. रोनाल्डोच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर मॅंचेस्टर युनायटेड संघाने न्यू कॅसल युनायटेड संघाचा धुव्वा उडवला. ४-१ अशा अंतिम निकालासह युनायटेडने विजयी घोडदौड सुरू ठेवली.

मँचेस्टर युनायटेडच्या ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात हा सामना रंगला होता. या सामन्यातून जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो आपले पुनरागमन करणार म्हणून या सामन्याची उत्सुकता फारच वाढली होती. मँचेस्टर युनायटेड संघाच्या समर्थकांनी मैदान खच्च भरून गेले होते. तर जगभरातील फुटबॉल चाहते टीव्हीसमोर बसून सामन्याचा आनंद लुटत होते.

हे ही वाचा:

अपेक्षेप्रमाणे रोनाल्डो सुरुवातीपासूनच मैदानात आपला जलवा दाखवताना दिसला. सामन्याचा पहिला अर्धांक संपता संपता रोनाल्डोने एक अप्रतिम गोल नोंदवत मँचेस्टर युनायटेड संघाला आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी फार काळ टिकली नाही. दुसऱ्या अर्धांकाच्या सुरुवातीलाच मॅनक्विलो याने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. पण त्यानंतर रोनाल्डोने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवत पुन्हा एकदा आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पुढे ब्रुनो फर्नांडिस याने ८० व्या मिनिटाला लांबच्या अंतरावरून एक अप्रतिम गोल नोंदवला आणि संघाची आघाडी वाढवली. सामना संपत आला होता आणि मँचेस्टर युनायटेड संघाचा विजय निश्चित होता, अशातच जेसी लींगर्ड याने अखेरच्या काही मिनिटांत गोल करून विजयी मोहर उमटवली. मँचेस्टर युनायटेडच्या या विजयामुळे प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत ते प्रथम क्रमांकावर आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version