होळीच्या दिवशी ‘द केरल स्टोरी २’ सुपरहिट! पाच दिवसांची कमाई १६.६५ कोटींवर

बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी

होळीच्या दिवशी ‘द केरल स्टोरी २’ सुपरहिट! पाच दिवसांची कमाई १६.६५ कोटींवर

‘द केरला स्टोरी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. होळीच्या निमित्ताने मंगळवारी चित्रपटाने चार कोटींची कमाई केली, जी सोमवारी (२ मार्च) झालेल्या कमाईपेक्षा सुमारे ६० टक्के अधिक आहे. यासह चित्रपटाची पहिल्या पाच दिवसांची एकूण कमाई १६.६५ कोटींवर पोहोचली असून सिनेमा आत १७ कोटींच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

चित्रपटाची मागील पाच दिवसांची कमाई पुढीलप्रमाणे —

चित्रपटाने शुक्रवार (27 फेब्रुवारी) रोजी तुलनेने संथ सुरुवात केली होती. प्रदर्शनावर लावण्यात आलेली तात्पुरती स्थगिती दुपारनंतर हटवण्यात आल्यामुळे पहिल्या दिवसाचे कलेक्शन मर्यादित राहिले. मात्र, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांचा लाभ मिळाल्याने कमाईत वेग आला. तिसऱ्या दिवसापर्यंत चित्रपटाने चांगली गती पकडली होती. सोमवारी नियमित वीकडे घसरण दिसून आली आणि कलेक्शन ₹२.५० कोटींवर आले. मात्र होळीच्या सणामुळे चित्रपटाला नवसंजीवनी मिळाली आणि पाचव्या दिवशी ₹४ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली.

विश्लेषकांच्या मते, वादग्रस्त विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये वीकडे दरम्यान चढ-उतार दिसणे सामान्य आहे. सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात प्रेक्षकांची संख्या वाढल्याने अशा चित्रपटांना अतिरिक्त चालना मिळते. हाच ट्रेंड या चित्रपटाबाबतही दिसून आला आहे. जरी हा चित्रपट आपल्या प्रीक्वेलइतकी वेगवान सुरुवात करू शकला नसला, तरी स्थिर वीकेंड कामगिरी आणि सणासुदीची भर यामुळे पहिल्या पाच दिवसांत त्याने समाधानकारक स्थान मिळवले आहे.

हे ही वाचा:

भारतीय सैन्य दलाला मिळणार ३०० ‘धनुष’ हॉवित्झर तोफा!

रॅपिडो चालकाच्या खात्यातून ५५० कोटींचे व्यवहार!

‘तिने’ सुरू केली घरगुती मदतीसाठी कंपनी; ८०० कोटींची उलाढाल

होर्मुझ सामुद्रधुनीत विमा न मिळाल्याने १५० हून अधिक जहाजे अडकली

ट्रेड तज्ज्ञांच्या मते, येत्या शुक्रवारी कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने ‘द केरल स्टोरी २: गोज बियॉन्ड’ला स्क्रीन स्पेस आणि प्रेक्षकांचे लक्ष कायम ठेवण्यास मदत होऊ शकते. जर दुसऱ्या वीकेंडपर्यंत ही गती कायम राहिली, तर चित्रपट ₹२५ कोटींचा टप्पा पार करू शकतो. सुमारे ₹३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट आपल्या बॉक्स ऑफिस कमाईच्या जोरावर खर्च वसुलीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता सहाव्या दिवसाची आणि आगामी वीकेंडची कामगिरी चित्रपटाच्या दीर्घकालीन यशाचा निर्णय ठरवणार आहे.

Exit mobile version