घरविशेषत्र्यंबकेश्वरमध्ये रुग्णालय स्थलांतराला विरोध

त्र्यंबकेश्वरमध्ये रुग्णालय स्थलांतराला विरोध

प्रशासनाने दिली आठ दिवसांची स्थगिती

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथाच्या विकासासाठी उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. नागरिकांच्या वाढत्या विरोधाची दखल घेत प्रशासनाने रुग्णालय स्थलांतराच्या प्रक्रियेला पुढील आठ दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. या काळात रुग्णालयासाठी त्र्यंबकेश्वर शहरातच पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी केली जाणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे भगवान शिवाच्या दर्शनासाठी वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येतात. भाविकांची गर्दी शहरातील रस्त्यांवर वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी दर्शन पथ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पासाठी उपजिल्हा रुग्णालयासह पंचायत समिती कार्यालय आणि पशुवैद्यकीय दवाखाना पाडण्याची योजना आहे. रुग्णालयाची इमारत पाडण्यापूर्वी ते नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तुपेफाटा येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
हरित लवादाला आदेश; श्री श्री रविशंकर यांना ५ कोटींचा दंड परत करा!

राष्ट्रभक्तीचे आवरण घालून काँग्रेस स्वतःला किती लपवणार?

जेन झी साठी भाजपाची मोठी नवी रणनीती

पीओकेत वार्तांकन करणारा पाक पत्रकार ठरला ‘दहशतवादी’

मात्र, शहरातील महत्त्वाची आरोग्यसेवा शहराबाहेर हलविण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. रुग्णालयासाठी जिल्हा आरोग्य विभागाने त्र्यंबक पोलीस ठाण्यासमोरील केशव ढोन्नर यांच्या जागेचा पर्याय सुचवला होता. मात्र, ही जागा १०० खाटांच्या रुग्णालयाच्या विस्तारासाठी अपुरी असल्याचे ढोन्नर यांनी स्पष्ट केले. या परिसरात अतिक्रमण असून, जागेसमोर वाहनतळ असल्याने तेथे रुग्णालय उभारण्याऐवजी उपलब्ध इतर पर्यायांचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक नेत्यांकडून देवस्थानच्या जागेचाही पर्याय पुढे करण्यात आला आहे. देवस्थानच्या एकूण ३१ एकर जागेपैकी पाच एकर जागा रुग्णालयासाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अमृत कुंभ, वाहनतळ, बाजार समितीच्या इमारतीचा पहिला मजला आणि महादेवी ट्रस्टच्या जागेचाही विचार करण्याची मागणी आहे. पर्यायी जागा उपलब्ध असताना विद्यमान रुग्णालयच स्थलांतरित करण्याची गरज काय, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन स्थलांतराला आठ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्र्यंबकच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनीही रुग्णालयाचे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत प्रशासन कोणता पर्याय निवडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दर्शन पथाचा विकास आणि भाविकांच्या सुविधांसोबतच स्थानिक नागरिकांना सहज उपलब्ध होणारी आरोग्यसेवा कायम ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version