श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१६ मध्ये दिल्लीतील यमुना नदीच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पूरक्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हल’मुळे पर्यावरणाचे नुकसान झाल्याच्या प्रकरणात संस्थेने भरलेला ५ कोटी रुपयांचा दंड परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिले.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सांस्कृतिक महोत्सवामुळे यमुना नदीच्या नाजूक परिसंस्थेचे नुकसान झाले, याचा थेट पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या अधिपत्याखालील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय संस्था ‘व्यक्ती विकास केंद्र’ यांनी भरलेली ५ कोटी रुपयांची रक्कम दिल्ली विकास प्राधिकरणाने परत करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
२०१७ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने या महोत्सवाच्या तयारीदरम्यान यमुना पूरक्षेत्राचे नुकसान झाल्याबद्दल ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला जबाबदार धरत ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा महोत्सव मार्च २०१६ मध्ये यमुना नदीच्या काठावर आयोजित करण्यात आला होता.
हे ही वाचा:
राजस्थानातील ६११ सरकारी शाळा अजूनही इमारतीविना
साखरेच्या दरात भडका; महिनाभरात २१ टक्क्यांची वाढ
अत्याधुनिक यंत्रसामग्री उत्पादनवाढीची १.२ अब्ज डॉलरची योजना
“होर्मुझ आता अमेरिकेचा प्रदेश” ट्रम्प यांचा पुनरुच्चार
दिल्ली विकास प्राधिकरणावरही नाराजी
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला दिलासा देतानाच सर्वोच्च न्यायालयाने यमुना पूरक्षेत्राच्या संरक्षणात दिल्ली विकास प्राधिकरण अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने दिल्ली विकास प्राधिकरणाला यमुना पूरक्षेत्राच्या पुनर्वसनाचे काम सुरू ठेवण्याचे निर्देशही दिले. राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांनुसार हे काम पुढे नेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
‘वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हल’चा आयोजन ११ ते १३ मार्च २०१६ दरम्यान करण्यात आला होता. महोत्सवासाठी यमुना नदीच्या काठावरील मोठ्या परिसराचा वापर करण्यात आल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. ११ मार्च रोजी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी आयोजकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दंडाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली होती.
लवादाने त्यांना त्या दिवशी २५ लाख रुपये जमा करण्याची परवानगी दिली आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने सुरुवातीला २५ लाख रुपये भरले. त्यानंतर उर्वरित ४ कोटी ७५ लाख रुपये दंड म्हणून भरण्याऐवजी बँक हमी म्हणून स्वीकारावेत, अशी मागणी संस्थेने केली होती. ही रक्कम परिसरात जैवविविधता उद्यान उभारण्यासाठी वापरण्याचीही सूचना करण्यात आली होती. मात्र, अखेरीस संस्थेने संपूर्ण ५ कोटी रुपयांचा दंड भरला.
दीर्घ कायदेशीर लढाई
दंडाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर या प्रकरणावर दीर्घकाळ कायदेशीर लढाई सुरू होती. आता सर्वोच्च न्यायालयाने महोत्सवामुळे यमुना नदीच्या परिसंस्थेला नुकसान झाल्याचा थेट पुरावा नसल्याचे स्पष्ट करत दंडाची ५ कोटी रुपयांची रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेला मोठा दिलासा मिळाला असून, यमुना पूरक्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित सरकारी यंत्रणांनी प्रभावीपणे पार पाडण्याची गरज असल्याचेही न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
