कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) चिप्स तयार करणाऱ्या जगातील आघाडीच्या एनव्हिडिया कंपनीने सोमवारी मोठी घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जेनसन हुआंग यांची तात्काळ प्रभावाने पुन्हा एकदा कंपनीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि संचालक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला आहे.
एनव्हिडियाने एका निवेदनात सांगितले की, अलीकडच्या काळात संचालक मंडळाने जेनसन हुआंग यांच्यासोबत अनेक बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
कंपनीने म्हटले आहे की, हुआंग यांची पारदर्शकता, नेतृत्वक्षमता आणि कंपनीचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या योग्यतेवर संचालक मंडळाचा पूर्ण विश्वास आहे. या प्रक्रियेदरम्यान मंडळाने अमेरिकन सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यांच्याकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे हुआंग यांच्या पुनरागमनामुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या नामांतरासाठी सरकारची तयारी
सिराजला वगळण्याचा निर्णय कठीणच
केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक
एनव्हिडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष हार्वे सी. जोन्स यांनी सांगितले की, कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी जेनसन हुआंग हेच सर्वात योग्य व्यक्ती असल्याचे मंडळाचे मत आहे. त्यांचे पुनरागमन भागधारक, कर्मचारी, व्यावसायिक भागीदार आणि ग्राहक यांच्या हिताचे आहे. यावेळी त्यांनी अंतरिम सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या कोलेट क्रेस यांचेही कौतुक केले. कोलेट क्रेस यापुढेही कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून आपली जबाबदारी पार पाडत राहतील.
पुनरागमनानंतर जेनसन हुआंग यांनी सांगितले की, जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एका कंपनीचे पुन्हा नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब आहे. आपण सध्या एका ‘नव्या औद्योगिक क्रांती’च्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, असे सांगत त्यांनी पूर्ण नम्रतेने आणि नव्या बांधिलकीने कामावर परतत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी संचालक मंडळ, कर्मचारी, भागधारक, उद्योग क्षेत्रातील नेते आणि जागतिक भागीदारांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले.
अलीकडेच प्रसारमाध्यमांमध्ये जेनसन हुआंग हे परदेशी गुप्तचर यंत्रणांच्या संभाव्य कारवाईचे लक्ष्य बनल्याचा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र संचालकांची विशेष समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. या तपासात मदत करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर सल्लागारांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
