पश्चिम बंगाल राज्याचे नाव आता इंग्रजीतही ‘पश्चिम बंगा’ (Paschim Banga) करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. येत्या ९ डिसेंबरला हा प्रस्ताव राज्य विधानसभेत मांडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, सध्या इंग्रजीत ‘West Bengal’ असे असलेले राज्याचे नाव बदलून ‘Paschim Banga’ असे केले जाईल. हे नाव इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये एकसारखेच लिहिले जावे, अशी सरकारची भूमिका आहे. ९ डिसेंबरला विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर संसदेतील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
हे ही वाचा:
गोध्रा ट्रेन हत्या कांडातील दोषीला वैद्यकीय जामीन
भारताकडून नेपाळला २४ हजार कोटींचे विकास पॅकेज
मानहानी प्रकरणात ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा
दरम्यान, राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ४ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या अधिवेशनात नामांतराच्या प्रस्तावासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या नामांतराचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. २०११ मध्ये तत्कालीन ममता बॅनर्जी सरकारने राज्याचे नाव ‘पश्चिम बंगा’ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर २०१६ आणि २०१८ मध्येही नाव बदलण्याचे प्रयत्न झाले. मात्र, केंद्र सरकारची मंजुरी न मिळाल्याने हे प्रस्ताव प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. आता नव्या सरकारने पुन्हा एकदा हा मुद्दा पुढे आणला आहे.
