दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने ‘ऑपरेशन दीप’ ही विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या १५ दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. विनातिकीट तसेच अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालणे आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी व सुरळीत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मुंबई सेंट्रल विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर तसेच धावत्या गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘दीप’ या शब्दातील चार घटकांनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची ओळख पटवणे, तिकिटांची आणि ओळखपत्रांची तपासणी करणे, रेल्वे नियमांची कठोर अंमलबजावणी करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून रेल्वे कायद्यानुसार दंड वसूल करणे यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अधिक कडक होणार आहे.
हे ही वाचा:
वकिलांवरील हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
राहुल गांधींची पुन्हा परदेशवारी…आता अमेरिका दौरा
पंजाबमध्ये पश्चिम बंगालची पुनरावृत्ती होईल काय?
आधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!
दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी तिकीट काढावे आणि डिजिटल तिकीट बुकिंग सुविधांचा अधिकाधिक वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या गर्दीत प्रवासातील शिस्त राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही विशेष मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
