लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे नुकतेच व्हिएतनाम दौऱ्यावर गेले होते. तिथे ते कोणत्या कारणासाठी गेले होते, हे स्पष्ट झाले नव्हते मात्र त्यानंतर त्यांची दिल्लीत सभा झाली. आता ते पुन्हा एकदा परदेशात जात असून १६-१९ नोव्हेंबर या काळात ते अमेरिकेला जाणार असल्याचे कळते. मात्र त्यांच्या या परदेश दौऱ्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी हे १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि शिकागो या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते भारतीय वंशाच्या नागरिकांशी तसेच विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते भारतापेक्षा परदेशात अधिक वेळ घालवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ते पुन्हा एकदा सुट्टी घालवण्यासाठी आणि आपल्या ‘अराजकतावादी मित्रांना’ भेटण्यासाठी अमेरिकेला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
प्रदीप भंडारी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी हे देशात राहण्यास पात्र नसल्याचे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. भारतात राहण्यापेक्षा परदेश दौऱ्यांमध्येच त्यांना अधिक रस असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा:
हार्ले डेव्हिडसनची नवी ४४० सीसी क्रूझर बाईक
व्हॉट्सॲपवर दिवाळी बोनसच्या नावाने सायबर जाळे
सिंधू-लक्ष्यची पदकांची कमाई; खेळाडूंच्या खिशाला मात्र कात्री!
कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना
व्होटचोरी नाही, हा आळशीपणाचा परिणाम
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधी भारतापेक्षा परदेशात अधिक वेळ घालवत असतील, तर काँग्रेस पक्ष भारतीय जनतेकडून मतांची अपेक्षा कशी करू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केलेल्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांनाही भंडारी यांनी प्रत्युत्तर दिले. देशात व्होट चोरी होत नसून काँग्रेस नेत्याची आळशीपणाची समस्या असल्याची टीका त्यांनी केली.
२ नोव्हेंबर रोजी भाजपचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी या दौऱ्यांच्या स्वरूपाबाबत संशय व्यक्त करत परदेशातील काही संघटनांशी राहुल गांधी यांच्या कथित संबंधांचाही उल्लेख केला. बोफोर्स प्रकरण, हिंडेनबर्ग रिसर्च, भारतासंदर्भातील परदेशी माध्यमांमधील वृत्तांकन आणि परदेशातील संस्थांशी राहुल गांधी यांच्या भेटींचा संदर्भ देत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांवर भाजपचे आरोप
यापूर्वी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांनी त्यांच्या २२ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात ५४ परदेश दौरे केल्याचा दावा केला होता. या दौऱ्यांवर अंदाजे ६० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगत या खर्चाचा स्रोत काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
परदेशातील संस्थांकडून काही दौऱ्यांचा खर्च उचलण्यात आला असेल, तर त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याबाबतही भाजपने स्पष्टीकरण मागितले होते.
