‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कराने ड्रोन युद्धासाठीची तयारी अधिक व्यापक करण्यावर भर दिला आहे. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्यावर हल्ला करणे आणि शत्रूची ड्रोन यंत्रणा निष्प्रभ करण्याची क्षमता विकसित केली जात आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत समोर आलेल्या खरेदी प्रस्तावांमधून लष्कराच्या या नव्या रणनीतीचे संकेत मिळतात.
या योजनेंतर्गत लांब पल्ल्यापर्यंत टेहळणी करणारे ड्रोन, लक्ष्याची अचूक ओळख पटवणारी यंत्रणा, एफपीव्ही (FPV) ड्रोनच्या साहाय्याने हल्ले करण्याची क्षमता आणि ठरावीक ठिकाणी पेलोड सोडणारी उपकरणे यांचा समावेश आहे. याशिवाय, सैनिकांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देणे आणि शत्रूचे ड्रोन शोधून त्यांचा धोका निष्प्रभ करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यावरही भर दिला जात आहे.
‘भास्कर’च्या वृत्तानुसार, लष्कराने कमी उंचीवरून येणाऱ्या हवाई धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि ते निष्प्रभ करण्यासाठी ९ ‘लो अल्टिट्यूड एरियल थ्रेट रिस्पॉन्स अँड मिटिगेशन सिस्टीम’ खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी लांब अंतरावरून निगराणी करण्यासाठी १० ‘इंटिग्रेटेड लॉन्ग रेंज सर्व्हिलन्स ड्रोन’च्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली होती. यावरून लष्कर एकाच वेळी टेहळणीची क्षमता आणि ड्रोनविरोधी संरक्षण व्यवस्था मजबूत करत असल्याचे स्पष्ट होते.
हे ही वाचा:
धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ आपोआप मिळणार नाही!
आठ वर्षांपूर्वीच्या व्हिडीओवरून ध्रुव राठीला समन्स
पोलिसांवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात गुन्हा
ड्रोनच्या निर्मिती आणि कार्यप्रणालीसाठी आवश्यक असलेल्या २७३ वस्तूंची यादीही लष्कराने प्रसिद्ध केली आहे. यात मोटर, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, ग्राउंड कंट्रोल सिस्टीम, फ्लाइट कंट्रोलर, कॅमेरा, बॅटरी आणि रिमोटद्वारे नियंत्रित होणाऱ्या मल्टिपल पेलोड रिलीज यंत्रणेचा समावेश आहे. सामान्यतः निगराणी करणारे ड्रोन छायाचित्रे आणि व्हिडीओच्या माध्यमातून माहिती पुरवतात. मात्र, पेलोड रिलीज यंत्रणेमुळे ड्रोनमधून ठरवलेल्या ठिकाणी वस्तू किंवा उपकरणे सोडता येतात. त्यामुळे भारतीय लष्कर ड्रोनचा वापर केवळ माहिती गोळा करण्यासाठी न करता, आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष कारवाई आणि शत्रूच्या ड्रोनपासून संरक्षण करण्यासाठीही सज्ज होत आहे.
