भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर, खर्चकपातीची रणनीती आणि बदलत्या व्यावसायिक गरजांमुळे रोजगाराच्या परिस्थितीत मोठे बदल होत आहेत. देशातील टीसीएस, इन्फोसिस, एचसीएलटेक, विप्रो, टेक महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्री या सहा प्रमुख आयटी कंपन्यांमधून गेल्या वर्षभरात सुमारे ९२ हजार कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. कर्मचारी नोकरी सोडण्याचे प्रमाण हे आयटी उद्योगातील सामान्य मर्यादेत असले, तरी नवीन भरतीचा वेग मंदावल्याने रोजगाराच्या संधींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कंपन्यांकडून मनुष्यबळाचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात असून, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांना प्राधान्य दिले जात आहे.
एक्सफेनो या कर्मचारी भरतीविषयक संस्थेच्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांपैकी पाच महिन्यांत आयटी आणि अभियांत्रिकी क्षेत्रात नवीन भरतीपेक्षा नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. परिणामी, या सहा कंपन्यांमधील एकूण कर्मचारीसंख्येत घट झाली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये या कंपन्यांमध्ये एकूण ८ लाख २२ हजार १४४ कर्मचारी कार्यरत होते. ऑक्टोबर २०२६ मध्ये ही संख्या घटून ७ लाख ९७ हजार ७२२ वर आली. याशिवाय, वर्षभरातील एकूण भरतीमध्येही घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा:
फेसबुक युजर्सचा डेटा लीक प्रकरणात मेटाला २५ अब्ज डॉलरचा दंड
पाकिस्तान, तुर्किये, कतार, इंडोनेशियामध्ये ‘बद्र’ संरक्षण करार
दाऊद भारतात नाही, ओसामा बिन लादेनसारखा पाकिस्तानातच!
रेहान वाड्राच्या प्रदर्शनातून आंदोलनांचे फोटो हटवले
या परिस्थितीमागे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने कोडिंग, सॉफ्टवेअर चाचणी, डेटा विश्लेषण आणि इतर नियमित कामे कमी वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याने कंपन्यांच्या कामकाजाच्या पद्धती बदलत आहेत. परिणामी, पारंपरिक कौशल्यांबरोबरच एआय आणि ऑटोमेशनशी संबंधित कौशल्ये आत्मसात केलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व मिळत आहे. त्याचवेळी, ग्राहकांकडून नवीन प्रकल्प मिळण्याचा वेग, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि खर्च कमी करण्याची गरज यांचाही भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे. प्रकल्प उपलब्ध नसलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यावरही कंपन्या भर देत आहेत.
दरम्यान, सर्वच आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे चित्र नसून काही कंपन्यांनी नवीन भरतीही केली आहे. सप्टेंबर तिमाहीत टीसीएसने ४ हजार २५८, एचसीएलटेकने ६ हजार ४५० आणि टेक महिंद्राने ५ हजार ४४६ कर्मचाऱ्यांची भरती केली. याउलट, विप्रोने याच कालावधीत ६ हजार ७१६ कर्मचाऱ्यांची कपात केली. या आकडेवारीवरून आयटी क्षेत्रातील रोजगाराचे चित्र कंपनीनुसार बदलत असल्याचे स्पष्ट होते. आगामी काळात तांत्रिक कौशल्ये, एआयचा प्रभावी वापर आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता या बाबी कर्मचाऱ्यांसाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कौशल्यवृद्धी करणे आवश्यक ठरणार आहे.
