अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’चा उल्लेख ‘भारतस्थित गुन्हेगारी संघटना’ असा केल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींच्या अहवालावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दाऊद पाकिस्तानात वास्तव्यास असून, तो भारतात दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांत १९९३ पासून वॉन्टेड आहे, याचा अहवालात योग्य उल्लेख नसल्याचे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तानमध्येच ओसामा बिन लादेन सापडला आणि त्याला ठार करण्यात आले, याची आठवणही भारताने करून दिली.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीतील चर्चेदरम्यान भारताच्या संयुक्त राष्ट्रांतील स्थायी मिशनचे प्रथम सचिव रघू पुरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादविरोधी विषयावरील विशेष प्रतिनिधी बेन सॉल यांच्या अहवालात दाऊद इब्राहिमच्या नेतृत्वाखालील डी-कंपनीचा उल्लेख ‘भारतस्थित’ गुन्हेगारी टोळी असा करण्यात आला होता. या वर्णनामुळे वस्तुस्थितीचे चुकीचे चित्र उभे राहत असल्याचे भारताने म्हटले.
हे ही वाचा:
रेहान वाड्राच्या प्रदर्शनातून आंदोलनांचे फोटो हटवले
सुटका होताच सौरव दास, आशुतोष रांकाला क्राईम ब्रँचने बोलावले
“परदेशी नेत्यांची वक्तव्ये मूर्खपणाची, अस्वीकार्य”
वाशीममध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून राडा
पुरी यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २००३ मध्ये दाऊदला अल-कायदाशी संबंध असल्याच्या कारणावरून निर्बंधांच्या यादीत समाविष्ट केले होते. मात्र, त्यापूर्वीच तो भारतातून फरार झाला होता आणि १९९३ मधील दहशतवादी हल्ल्यांसह विविध प्रकरणांत भारताला हवा आहे, हा महत्त्वाचा संदर्भ अहवालात पुरेशा स्पष्टतेने नमूद केलेला नाही. तथ्यात्मक चुका असलेले अहवाल कोणतीही जबाबदारी निश्चित न करता प्रसिद्ध होणे चिंताजनक असल्याचे पुरी यांनी म्हटले. अशा प्रकारांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेला आणि संस्थेच्या वैधतेला धक्का बसू शकतो, असा इशाराही भारताने दिला.
