पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गायघाटा येथे १७ वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. प्रल्हाद दास (वय २३) असे आरोपीचे नाव असून, गुन्ह्याच्या घटनास्थळाची पुनर्रचना सुरू असताना त्याने पोलिस कर्मचाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला गुन्ह्याच्या घटनास्थळी नेण्यात आले होते. त्यावेळी त्याने बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या घटनेत कोणताही पोलीस कर्मचारी जखमी झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील १७ वर्षीय मुलगी अकरावीत शिकत होती. २४ ऑक्टोबरच्या रात्री ती कुटुंबीय आणि मित्रांसोबत घराजवळील सांस्कृतिक कार्यक्रमाला गेली होती. रात्री उशिरा मोबाईलवर फोन आल्यानंतर ती कार्यक्रमस्थळावरून निघून गेली; मात्र घरी परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी तिचा मृतदेह एका नातेवाइकाच्या घरामागील परिसरात आढळला. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून प्रल्हाद दासला अटक केली होती. तो पीडित मुलीचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
भारत-बांगलादेश सीमेवर कुंपणाच्या कामाला वेग
पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघे पोलिसांच्या जाळ्यात
१०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्यांना अटक
राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या
पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन महिन्यांत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या पुनर्रचनेदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जुलै महिन्यात दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवरील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी प्रबास मंडल याचाही अशाच परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्या वेळीही आरोपीने पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
