घरबिजनेसबायनान्सवरील सायबर हल्लात ५५ हजार कोटींची क्रिप्टो मालमत्ता लुटली

बायनान्सवरील सायबर हल्लात ५५ हजार कोटींची क्रिप्टो मालमत्ता लुटली

उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा प्रताप

जगातील आघाडीचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज असलेल्या बायनान्सवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यामुळे जागतिक क्रिप्टो बाजारात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तब्बल ६.३ अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ५५ हजार ८०० कोटी रुपयांच्या क्रिप्टो मालमत्तेची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील कुख्यात हॅकर्सचा हात असल्याचा संशय आहे. ब्लॉकचेन विश्लेषण क्षेत्रातील टीआरएम लॅब्सने या हल्ल्याचा संबंध उत्तर कोरियाशी जोडला असून, हा क्रिप्टो क्षेत्रातील सर्वात मोठ्या सायबर चोरीच्या घटनांपैकी एक मानला जात आहे.

टीआरएम लॅब्सच्या विश्लेषणानुसार, हॅकर्सनी दहा वेगवेगळ्या ब्लॉकचेनवरील डिजिटल वॉलेटमधून क्रिप्टो मालमत्ता हस्तांतरित केली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करण्यात आली. या हल्ल्यामागे उत्तर कोरियाशी संबंधित ‘ट्रेडरट्रेटर’ या हॅकिंग गटाचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बायनान्सच्या एका डेव्हऑप्स इंजिनिअरचा लॅपटॉप हॅक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या माध्यमातून हल्लेखोरांनी कंपनीच्या अंतर्गत तांत्रिक प्रणालीत प्रवेश मिळवून अनधिकृत व्यवहार केल्याचा संशय आहे.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर १९९१ सारखेच आव्हान

नेतान्याहूंच्या आघाडीला बहुमतापासून ८ जागा कमी

भारताची निर्यात एक लाख कोटी डॉलरवर जाण्याची शक्यता

राहुल गांधींच्या अराजकतेच्या राजकारणाविरोधात भाजपचा देशभरात एल्गार

या घटनेनंतर बायनान्सने तातडीने सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, चोरी झालेल्या मालमत्तेपैकी सुमारे ३ अब्ज डॉलरची मालमत्ता गोठवण्यात यश आले आहे. मात्र, एकूण नुकसानीचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. ग्राहकांच्या निधीचे संरक्षण करण्यासाठी कंपनीच्या ‘सिक्युअर ॲसेट फंड फॉर युझर्स’चा वापर करण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. या प्रकरणात ब्लॉकचेन विश्लेषण कंपन्यांकडून व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे.

या हल्ल्यामुळे डिजिटल चलन व्यवहारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार वेगवान आणि जागतिक स्तरावर होत असले, तरी त्यामध्ये सायबर सुरक्षेची मोठी आव्हाने कायम असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः उत्तर कोरियाशी संबंधित हॅकिंग गटांकडून डिजिटल मालमत्तेला लक्ष्य केले जात असल्याने जागतिक वित्तीय संस्थांची चिंता वाढली आहे. अब्जावधी डॉलरची मालमत्ता काही मिनिटांत हस्तांतरित होण्याच्या या घटनेमुळे क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांना सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version