घरबिजनेसकॅन्सरवरील औषधांच्या किमतीत ९६ टक्क्यांपर्यंत कपात

कॅन्सरवरील औषधांच्या किमतीत ९६ टक्क्यांपर्यंत कपात

९ नोव्हेंबरपासून नवे दर लागू

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीत तब्बल ९६ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून हे सुधारित दर लागू होणार आहेत. कर्करोगाच्या उपचारांमध्ये औषधांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठे आर्थिक आव्हान ठरतो. अनेक रुग्णांना महागड्या औषधांमुळे उपचार सुरू ठेवणेही कठीण होते. अशा परिस्थितीत औषधांच्या किमती कमी करण्याचा हा निर्णय रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या औषध विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) कर्करोगावरील १३७ प्रकारच्या औषधांच्या व्यापार नफ्यावर ३० टक्क्यांची मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार ७६ औषध कंपन्यांनी १,२२५ औषधांच्या फॉर्म्युलेशन्सचे सुधारित दर सादर केले आहेत. त्यापैकी १,०३१ औषधांच्या किमती कमी झाल्या असून, ६०० औषधांच्या ब्रँडच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची दरवर्षी सुमारे ३,५०२ कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा:
दिपकेचे भाकीत… एनडीए सरकार २०२९ला सत्तेतून बाहेर

नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू

बिस्किट बाजारात रिलायन्सची दमदार एन्ट्री

पुणे मेट्रोमुळे शहराच्या अर्थकारणाला नवी गती

या दरकपातीचा परिणाम कर्करोगाच्या विविध उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर होणार आहे. उदाहरणार्थ, ‘ब्रायक्स्टा’ या औषधाच्या १०० मिलीग्रॅम इंजेक्शनची किंमत २५ हजार ९९५ रुपयांवरून ३ हजार ३१८ रुपयांपर्यंत कमी झाली आहे. तर स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पॅल्बोप्रो’ या औषधाची किंमत ४० हजार ४२१ रुपयांवरून २ हजार ७२० रुपयांपर्यंत खाली आली आहे. काही औषधांच्या किमतीत तर ९६.४५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

९ नोव्हेंबरपासून औषध विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना सुधारित दरानेच औषधांची विक्री करावी लागणार आहे. तसेच औषधांच्या नव्या किमतींच्या याद्या प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. रुग्णांना ‘फार्मा सही दाम’ अॅप आणि NPPA च्या संकेतस्थळावर सुधारित दर तपासता येतील. एकूणच, कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, आर्थिक अडचणींमुळे उपचार घेण्यास संघर्ष करणाऱ्या अनेक रुग्णांना यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version