कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) चा संस्थापक अभिजीत दिपके याने शनिवारी कोचीत झालेल्या सभेत भाजपाप्रणित एनडीएचे सरकार २०२९मध्ये सत्तेवरून खाली उतरेल असे भाकीत वर्तवले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए सरकारचा पराभव होईल आणि केंद्रातील सत्ताबदल होईल, असा दावा त्याने केला. केंद्रात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात बोलताना दिपके याने हे वक्तव्य केले. केंद्रातील सरकार केवळ निवडणुकीच्या माध्यमातूनच बदलता येऊ शकते, असे सांगतानाच त्याने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्यवस्थेची मागणी पुन्हा एकदा केली.
कोचीतील हे आंदोलन सीजेपीच्या ‘जंतरमंतर ऍट कोची’ या मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे संरक्षण करण्यासाठी एनडीए सरकार देशातील तरुणांविरोधात युद्ध पुकारत असल्याचा आरोप दिपकेने केला. ज्ञानेश कुमार यांना केंद्र सरकारकडून इतके महत्त्व का दिले जात आहे, असा सवालही त्याने उपस्थित केला.
सुरुवातीला नीट परिक्षा पेपरफुटीसंदर्भात आंदोलन करणाऱ्या दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी नंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अचानक त्यांनी आपली धोरणे का बदलली असा सवालही त्यानिमित्ताने उपस्थित केला गेला.
दिल्लीतील जंतरमंतर येथे राष्ट्रध्वज घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी स्वतःसह सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना झालेल्या अटकेचा संदर्भ देत दिपके म्हणाला की, आपण जिथे जाऊ तिथे तिरंगा हातात घेऊनच जाणार. हा तिरंगा उंचावल्यामुळे मला तुरुंगात पाठवण्यात आले. माझे दोन भाऊ सौरव आणि आशू यांनाही तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले. भारतात अशा प्रकारची घटना शेवटची ब्रिटिशांच्या राजवटीत घडली होती.”
हे ही वाचा:
चीनचा धोका म्हणूनच सियांग धरणाचे धोरण
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू
अंडरवर्ल्ड डॉन हेमंत पुजारी ‘रॉ’च्या ताब्यात
लोकलमध्ये हाणामारी; प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडला
एनडीए सरकारची तुलना ब्रिटिश राजवटीशी करताना दिपके याने सरकार नागरिकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तो म्हणाला, “मला अटक करायची असेल तर दिल्लीत करा, महाराष्ट्रात करा, केरळमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये करा. देशाच्या प्रत्येक भागातून मला अटक करा; पण मी पुन्हा बाहेर येईन आणि तिरंगा हातात घेऊन उभा राहीन.”
जंतर मंतरला आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर दिपकेचे सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास हे तिरंगा घेऊन जंतर मंतरवर गेले होते. तिथे आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आलेली असतानाही ते त्या परिसरात गेल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्यांनी शांतता राखण्यासंदर्भात बॉण्ड भरून दिल्यावर त्यांची सुटका करण्यात आली.
गेल्या १० ते १२ वर्षांपासून देशातील नागरिक शांत होते. मात्र, जंतरमंतरवरील आंदोलनामुळे लोकांना पुन्हा आपला आवाज आणि धैर्य मिळाल्याचा दावा दिपके यांनी केला.
ते म्हणाले, “गेल्या १० ते १२ वर्षांपासून कुठेतरी या देशाचा आवाज हरवला होता. मात्र, जंतरमंतरवर जे घडले, त्यामुळे देशाला पुन्हा आपला आवाज मिळाला आहे.” दिपके म्हणाला की, “मी असे म्हणत नाही की पूर्वीचे सरकार परिपूर्ण होते. मात्र, त्या काळातील भारत अधिक लोकशाहीवादी होता. त्या काळात पंतप्रधानांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. आणि लोकशाही अशीच असली पाहिजे.”
प्रकाश राज यांच्या आझादीच्या घोषणा
राजेंद्र मैदान येथे झालेल्या या सभेला विविध वयोगटांतील नागरिक उपस्थित होते. याआधी, अभिनेते प्रकाश राज यांनी मरीन ड्राइव्ह ते राजेंद्र मैदान असा मोर्चा काढला होता. आझादी, आझादीच्या घोषणाही प्रकाश राज यांनी दिल्या.
