रामनगरी अयोध्येत भव्य आणि ऐतिहासिक दीपोत्सव पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, दीपावलीच्या पवित्र सणानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामघाट हॉल्टजवळील निषाद वस्तीत भेट देत समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष ‘दीपावली मिलन’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दलित कुटुंबे, सफाई कर्मचारी, नाविक (मांझी समाज) तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरसेवकांना स्वतःच्या हस्ते दिवाळीच्या भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप केले.
मुख्यमंत्री योगी यानिमित्त म्हणाले, “आपण असा संकल्प केला पाहिजे की, भविष्यात आपल्या अयोध्येच्या वैभवावर कोणत्याही ‘मंथरा’ किंवा ‘मारीच’ची वाकडी नजर पडता कामा नये. अयोध्येला पुन्हा बदनाम करण्याचा आणि येथील वैभव लुटण्याचा कोणताही प्रयत्न यापुढे यशस्वी होऊ दिला जाणार नाही. आता अयोध्येत रामभक्तांवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. येथे ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्यामुळे कोणावरही लाठ्या-काठ्या चालवल्या जाणार नाहीत. तसेच पंचकोसी, १४ कोसी किंवा ८४ कोसी परिक्रमेवरही कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत.”
अयोध्येतील सफाई कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, “कालच्या दीपोत्सवात ३० लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. देश-विदेशातील लाखो भाविक रात्री उशिरापर्यंत अयोध्येतील रस्त्यांवर आणि घाटांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, आज सकाळी मी बाहेर पडलो, तेव्हा सर्व घाट आणि रस्ते पूर्णपणे स्वच्छ असल्याचे पाहून आश्चर्यचकित झालो. कुठेही कचरा किंवा अव्यवस्था दिसून आली नाही. या अद्भुत कार्यासाठी आणि समर्पित भावनेने केलेल्या सेवेसाठी अयोध्येतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”
सरयू घाटावरील नाविकांच्या योगदानाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, “सरयू मातेची महाआरती सुरू असताना आपले नाविक अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य बजावत होते. प्रत्येक सण, अमावस्या आणि पौर्णिमेला लाखो भाविक सरयू नदीत स्नान करण्यासाठी येतात. भाविकांची सुरक्षा आणि त्यांच्या श्रद्धेचे जतन करण्यासाठी नाविक, मांझी आणि निषाद समाजाचे जे महत्त्वपूर्ण योगदान असते, ते अत्यंत कौतुकास्पद आहे.”
हे ही वाचा:
हवा गेलेला फुगा उडविण्याचा प्रयत्न |
…म्हणून सोनिया राहुलना यशस्वी मानत नाहीत!
स्मॅटसाठी बडोद्याचा संघ जाहीर; हार्दिक पंड्याला डच्चू!
लॉर्ड्सवर दादांनी भिरकावलेली जर्सी मुंबईत झळकणार!
त्रेतायुगातील घटनांची आठवण करून देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या प्रकारे भगवान श्रीरामांनी निषादराज, माता शबरी, वानर आणि अस्वलांना सोबत घेऊन राक्षसांविरोधात लढा उभारला होता, त्याचप्रमाणे आजच्या या ‘नव्या अयोध्ये’च्या उभारणीत समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आहे.
ते म्हणाले, “आजची अयोध्या प्रत्यक्षात त्रेतायुगाची आठवण करून देत आहे. येणाऱ्या पिढ्या तुमच्याप्रती कृतज्ञ राहतील. कारण जेव्हा नव्या अयोध्येची उभारणी होत होती, तेव्हा आपल्या पूर्वजांनीही त्यासाठी अमूल्य योगदान दिले होते.”
यावेळी दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी आणि अवधपुरी स्वच्छ ठेवण्यासाठी या सर्वांनी दिलेले अमूल्य योगदान सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येची सुरक्षा आणि प्रतिष्ठा याबाबत कठोर आणि स्पष्ट संदेशही दिला.
