जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीचा परिणाम आता महागाई आणि सोन्याच्या दरावरही दिसून येत आहे. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील अस्थिरता आणि सौदी अरेबियातील ईस्ट-वेस्ट पाइपलाइनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०८ डॉलरपर्यंत पोहोचला. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम अमेरिकेच्या आर्थिक धोरणावर होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील किरकोळ महागाईत वाढ झाल्याने फेडरल रिझर्व्हसमोर महागाई नियंत्रणाचे आव्हान पुन्हा निर्माण झाले आहे. त्यामुळे १५ आणि १६ सप्टेंबरला होणाऱ्या फेडच्या बैठकीकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे. फेडकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्यास गुंतवणूकदारांचा कल सरकारी रोखे आणि इतर व्याज देणाऱ्या गुंतवणूक साधनांकडे वाढू शकतो. याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होतो. सोन्यावर व्याज मिळत नसल्याने व्याजदर वाढीच्या वातावरणात सोन्याचे आकर्षण काही प्रमाणात कमी होते.
हे ही वाचा:
इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दोन मच्छिमारी नौकांवर ड्रोन हल्ला
₹२ हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर शुल्काची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये गणेशपूजांची संख्या १ लाखांपार
जम्मू- काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करशी संबंधित तिघांना अटक
या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डच्या किमतीत सुमारे १.८ टक्क्यांची घट झाली, तर अमेरिकेतील गोल्ड फ्युचर्समध्येही दोन टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. डॉलर मजबूत झाल्याने सोन्यावर आणखी दबाव निर्माण झाला आहे. कारण सोन्याचे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये होत असल्याने डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी सोने महाग होते आणि त्याची मागणी कमी होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या वायदा दरात घसरण नोंदवण्यात आली असून, सोन्याचा भाव सुमारे १.५० लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास आला आहे. मात्र, भारतातील सोन्याचे दर केवळ आंतरराष्ट्रीय किमतींवर ठरत नाहीत. रुपयाची डॉलरच्या तुलनेतील स्थिती, आयात शुल्क, कर आणि देशांतर्गत मागणी यांचाही सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पुढील काळात कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील महागाई आणि फेडरल रिझर्व्हचा व्याजदर निर्णय हे सोन्याच्या दराची दिशा ठरवणारे महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.
