सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर महागाईचा आणखी एक मोठा भार पडणार आहे. मुंबईत १ सप्टेंबर २०२६ पासून दुधाच्या घाऊक दरात तब्बल ९ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ९३ रुपये प्रतिलिटर असलेला दुधाचा दर आता थेट १०२ रुपयांवर पोहोचणार आहे. हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीपासून हिवाळ्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना महागड्या दुधाचा सामना करावा लागणार आहे.
दूध उत्पादकांसमोर वाढत्या उत्पादन खर्चाचे मोठे आव्हान उभे राहिल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः दुधाळ जनावरांच्या किमती वाढण्याबरोबरच पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दाणा, तूरचुणी, चणाचुणी यांसारख्या पशुखाद्यांच्या किमतीत तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे उत्पादकांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. याशिवाय चारा, पेंड आणि जनावरांच्या देखभालीचा खर्चही वाढल्याने दूध उत्पादनाची एकूण किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हे ही वाचा:
तिबेटमध्ये नेपाळ सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला; पुन्हा महापुराचा धोका
आठ सिमकार्ड पाकिस्तानात पाठवणारे दाम्पत्य अटकेत
नेपाळमध्ये महापुराचं थैमान; मृतांचा आकडा ४६९ वर
वाढत्या खर्चाच्या तुलनेत सध्याच्या दरात दूध विकणे उत्पादकांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. उत्पादकांच्या मते, वाढलेल्या उत्पादन खर्चाचा ताण कमी करण्यासाठी दूध दरात वाढ करणे आवश्यक झाले होते. मात्र, या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. मुंबईतील अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहारात दूध हा अत्यावश्यक घटक असल्याने प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ महिन्याच्या घरखर्चातही लक्षणीय भर घालू शकते.
विशेष म्हणजे, ही दरवाढ सणासुदीच्या काळाच्या अगदी आधी लागू होत आहे. या काळात दूध, दही, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे दुधाच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम पुढे इतर डेअरी उत्पादनांच्या किंमतींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी दूध दरवाढीचा हा निर्णय निश्चितच चिंतेत भर घालणारा ठरणार आहे.
