भारतीय शेअर बाजारात नोव्हेंबर महिन्यात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या घसरणीला अवघ्या वीस दिवसांत मोठा ब्रेक लागला असून, सेन्सेक्स आणि निफ्टीने दमदार पुनरागमन केले आहे. या तेजीमागे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील वाढती गुंतवणूक हे प्रमुख कारण ठरले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे २ लाख ९५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये परिस्थिती बदलली असून, अवघ्या वीस दिवसांत त्यांनी १ लाख २२ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
या गुंतवणुकीचा थेट परिणाम शेअर बाजाराच्या कामगिरीवर झाला आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी ८५ हजार २२० अंकांवर असलेला सेन्सेक्स ऑक्टोबरअखेर घसरून ७४ हजार ४५९ अंकांवर आला होता. मात्र, नोव्हेंबरमधील तेजीमुळे सेन्सेक्सने जवळपास १३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ९०० अंकांच्या आसपास वाढीसह ८३ हजार ९१९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्येही नोव्हेंबर महिन्यात मोठी सुधारणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात १० हजार ३०८ कोटी रुपयांची खरेदी केली.
हे ही वाचा:
अँथ्रोपिकच्या आयपीओने कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले
सोने-चांदीनंतर आता तांब्याचे दरही कोसळले
रॉयल एनफिल्डची आता स्वस्त बाईक येणार
शेअर बाजारात तुफानी तेजी! सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला
विदेशी गुंतवणूकदारांच्या परतीमागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत घटक कारणीभूत आहेत. अमेरिकेसह तैवान आणि दक्षिण कोरियातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी या बाजारांमधील गुंतवणूक कमी करून भारताकडे मोर्चा वळवला आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई, भारतीय कंपन्यांचे सप्टेंबर तिमाहीतील चांगले आर्थिक निकाल आणि रुपयातील सुधारणा यामुळे भारतीय बाजाराचे आकर्षण वाढले आहे. विशेषतः वित्तीय सेवा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा मोठा ओघ पाहायला मिळाला आहे.
मात्र, या तेजीमुळे बाजारातील संपूर्ण नुकसान भरून निघाले आहे, असे म्हणता येणार नाही. गेल्या दहा महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या एकूण विक्रीपैकी आतापर्यंत केवळ ४० टक्के रक्कम पुन्हा बाजारात आली आहे. त्यामुळे आगामी काळात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहतो का, कंपन्यांच्या नफ्यात वाढ होते का आणि जागतिक आर्थिक परिस्थिती कशी राहते, यावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल. सध्याची तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक असली, तरी बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
