अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक अन्नधान्य बाजारपेठेत मोठे संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता ही भीती अतिशयोक्तीपूर्ण ठरल्याचे चित्र आहे. युद्धाला नऊ महिने उलटूनही जागतिक बाजारपेठेत धान्याचा तुटवडा निर्माण झालेला नाही. इंधन आणि वाहतूक खर्चात वाढ झाली असली, तरी अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर अन्नसंकट निर्माण होण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचे दिसून येत आहे.
२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक गहू पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यावेळी गव्हाचे दर प्रति बुशेल १४ डॉलरपर्यंत पोहोचले होते. मात्र, सध्या हे दर सहा डॉलरपेक्षाही कमी आहेत. अमेरिका-इराण युद्धानंतर गव्हाच्या किमतीत उलट सुमारे एक टक्का घट झाली आहे. मक्याचे दरही ४.५० डॉलरपेक्षा कमी असून त्यात मर्यादित वाढ झाली आहे. पाम तेल आणि सोयाबीनच्या किमतींमध्येही मोठे चढउतार झालेले नाहीत. मात्र, भारतीय उपखंडातील खराब मान्सूनमुळे तांदळाच्या किमतीत फेब्रुवारीपासून जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ
परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?
पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास
अमेरिकेच्या शेअर बाजारात एआय कंपन्यांना मोठा झटका
युद्धाचा परिणाम खतांच्या बाजारपेठेवरही झाला होता. पश्चिम आशियातील नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सुरुवातीला युरियाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र, इतर उत्पादक देशांनी पुरवठा वाढवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या नायट्रोजन खतांच्या किमती फेब्रुवारीच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. दुसरीकडे, युरोपमध्ये एकूण महागाई वाढली असली, तरी अन्नधान्याच्या किमतीतील वाढ मर्यादित आहे. मात्र, जगातील सुमारे ७० कोटी लोकांना गरिबीमुळे उपासमारीचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव कायम आहे.
दरम्यान, २०२७ मध्ये अन्नपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामागे धान्याचा तुटवडा नसून डिझेल, वाहतूक, पॅकेजिंग आणि उत्पादन खर्चातील वाढ ही प्रमुख कारणे असतील. भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांनी कृषी क्षेत्रात केलेली गुंतवणूक आणि धान्य साठवणूक व्यवस्थेमुळे जागतिक पुरवठ्याला स्थैर्य मिळाले आहे. त्यामुळे युद्धामुळे जगावर अन्नसंकट कोसळेल, ही भीती सध्या तरी खरी ठरलेली नाही.
