सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड (SGB) २०२१-२२ सीरिज-६च्या मुदतपूर्व परतफेडीची किंमत जाहीर केली असून, या गुंतवणुकीने अवघ्या पाच वर्षांत तब्बल २२८ टक्क्यांचा परतावा दिला आहे. ७ सप्टेंबर २०२१ रोजी जारी झालेल्या या गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुरुवातीची किंमत ४,६८२ रुपये प्रति ग्रॅम होती. आता मुदतपूर्व परतफेडीसाठी ही किंमत १५,३३४ रुपये प्रति युनिट निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच प्रति ग्रॅम तब्बल १०,६५२ रुपयांची वाढ झाली असून, सुरुवातीला १ लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य आता सुमारे ३.२८ लाख रुपये झाले आहे.
या गुंतवणुकीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे सोन्याच्या किमतीतील वाढीसोबतच गुंतवणूकदारांना दरवर्षी २.५० टक्के निश्चित व्याजही मिळाले आहे. हे व्याज सहा महिन्यांच्या अंतराने दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात गुंतवणूकदारांचा एकूण परतावा केवळ सोन्याच्या किमतीतील वाढीपुरता मर्यादित नाही, तर त्यात व्याजाची रक्कमही जोडली जाते. सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या वाढीमुळे SGB गुंतवणूकदारांना पारंपरिक सोन्याच्या तुलनेत वेगळा फायदा मिळाला आहे. विशेष म्हणजे SGB मध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी करून ठेवण्याची गरज नसल्याने त्याच्या साठवणुकीचा किंवा सुरक्षिततेचा खर्चही येत नाही.
हे ही वाचा:
दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी ‘कॉक्रोच’चे गैरवर्तन
भारताचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर
S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?
नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर
रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली १५,३३४ रुपये प्रति युनिट ही किंमत ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या बाजारभावावर आधारित आहे. मुदतपूर्व परतफेडीची किंमत ठरवताना परतफेडीच्या तारखेच्या आधीच्या तीन व्यावसायिक दिवसांतील सोन्याच्या बंद भावाची सरासरी घेतली जाते. या सीरिजसाठी २, ३ आणि ४ सप्टेंबर २०२६ या दिवसांच्या दरांच्या आधारे किंमत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच सोन्याच्या विक्रमी तेजीचा थेट फायदा SGB गुंतवणूकदारांना झाला असून, पाच वर्षांत १ लाख रुपयांची गुंतवणूक ३ लाख रुपयांहून अधिक झाली आहे.
