कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील दिग्गज कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. नेतृत्वाबाबतच्या चर्चांनंतर आणि राजीनाम्याच्या घडामोडींनंतर त्यांना आणखी एका मोठ्या आर्थिक धक्क्याला सामोरे जावे लागले आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात एनव्हिडियाच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे हुआंग यांची संपत्ती एका दिवसात सुमारे ६० हजार कोटी रुपयांनी कमी झाली. एआय उद्योगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या हुआंग यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, हुआंग यांच्या संपत्तीत ४.२५ टक्क्यांची घट झाली असून त्यांची एकूण संपत्ती १४४.७ अब्ज डॉलरवर आली आहे. या घसरणीमुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते १३ व्या स्थानावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ते पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. दुसरीकडे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्यांच्या संपत्तीत ६.०७ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली असून एकूण संपत्ती १३८ अब्ज डॉलर झाली आहे.
हे ही वाचा:
तृणमूलच्या सत्ताकाळातील माजी पोलीस अधिकाऱ्याची २.७८ कोटींची मालमत्ता जप्त
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर हजार कोटींची भरारी
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत हुआंग यांच्या संपत्तीत २९.८ अब्ज डॉलरची घट झाली आहे. फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या आकडेवारीत फरक असला, तरी दोन्ही निर्देशांकांमध्ये ते जगातील १३ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एनव्हिडियामधील त्यांची मोठी समभाग हिस्सेदारी ही त्यांच्या संपत्तीचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये होणाऱ्या चढ-उतारांचा थेट परिणाम त्यांच्या वैयक्तिक संपत्तीवर होत आहे.
दरम्यान, गुरुवारी अमेरिकेच्या बाजारात एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात १३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. शेअरचा भाव १४८.८० डॉलरपर्यंत खाली आला, जो गेल्या ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर होता. नंतर काही प्रमाणात सावरल्यानंतरही शेअर ४.३४ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. नेतृत्वाबाबतची अनिश्चितता आणि कंपनीशी संबंधित वादांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भूमिकेकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे
