मुंबईत सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी दोघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. नेपियन सी रोड परिसरात ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी हे दोघे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडताना आढळल्याचा आरोप आहे. कृष्णा दाबू ढेबे (४५) आणि अभय रामचंद्र घाडशी (३६) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पहिली घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. नेपियन सी रोडवरील प्रियदर्शिनी गार्डनसमोरील मिस्त्री मनोर इमारतीच्या खाली सार्वजनिक रस्त्यावर कृष्णा ढेबे फटाके फोडत असल्याचे पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. ढेबे हे घरगुती मदतनीस म्हणून काम करतात. दुसरी घटना १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास घडली. यावेळी बँक ऑफ बडोदाच्या बाहेरील पदपथावर अभय घाडशी फटाके फोडताना पोलिसांना आढळले. घाडशी हे वाहनचालक आहेत.
हे ही वाचा:
एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचा राजीनामा
सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमानाचे हार्ड लँडिंग
संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!
या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली. दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदेशीररीत्या जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
