जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टच्या विविध सेवांमध्ये गुरुवारपासून मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे जगभरातील हजारो वापरकर्त्यांना आउटलुक (Outlook), मायक्रोसॉफ्ट टीम्स (Teams), कोपायलट (Copilot) आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ (Microsoft 365) या सेवांचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागला. शुक्रवारी सकाळीही अनेक वापरकर्त्यांना या सेवांमध्ये अडथळे येत होते.
आउटलुकच्या सेवेत सर्वाधिक अडचणी नोंदवण्यात आल्या. सेवा ठप्प झाल्याच्या तक्रारींची माहिती देणाऱ्या डाऊनडिटेक्टर या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, शुक्रवारी पहाटे १.३० च्या सुमारास आउटलुकबाबतच्या तक्रारींची संख्या १ लाख ३८ हजार ५८ वर पोहोचली होती. पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा आकडा कमी होऊन सुमारे ३४ हजार ४९० झाला. अनेक वापरकर्त्यांना ई-मेल इनबॉक्स उघडता येत नव्हता, तर काहींना ई-मेल पाठवणे आणि प्राप्त करण्यात अडचणी येत होत्या. टीम्स आणि कोपायलटसह शेअरपॉइंट, वनड्राइव्ह आणि अन्य सेवांवरही परिणाम झाला.
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम केवळ मायक्रोसॉफ्टच्या सेवांपुरता मर्यादित राहिला नाही. ओपनएआय आणि अँथ्रॉपिक या कंपन्यांच्या एआय सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट ३६५ कनेक्टर्सवरही परिणाम झाला. त्यामुळे या सेवांशी संबंधित काही साधने अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
तृणमूलच्या सत्ताकाळातील माजी पोलीस अधिकाऱ्याची २.७८ कोटींची मालमत्ता जप्त
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा
एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचा राजीनामा
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या काही सर्व्हरवर क्षमतेपेक्षा अधिक भार निर्माण झाला होता. अनेक सर्व्हर स्वयंचलित तपासणीत अयशस्वी झाल्याने ते अचानक अनुपलब्ध झाले. त्यामुळे उर्वरित सर्व्हरवर अतिरिक्त भार पडून कनेक्टिव्हिटीच्या समस्या निर्माण झाल्या. कंपनीने प्रभावित सर्व्हर पुन्हा सुरू करणे आणि इंटरनेट वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सुरुवातीचे उपाय अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले नसल्याचेही कंपनीने मान्य केले. दरम्यान, हा सायबर हल्ला असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे.
