घरबिजनेसजिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ ऑक्टोबरअखेर येण्याची शक्यता

जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ ऑक्टोबरअखेर येण्याची शक्यता

१२ लाख कोटींच्या मूल्यांकनावर नजर

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल व्यवसायाचा प्रमुख भाग असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतीक्षित आयपीओची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सची शेअर बाजारात नोंदणी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता असून, कंपनीचे एंटरप्राइज व्हॅल्यूएशन सुमारे १२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हा भारतीय शेअर बाजारातील मोठ्या आयपीओंपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

कंपनीकडून सुमारे ३.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ३३ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सने आयपीओच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, दुबई, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये गुंतवणूकदारांसोबत रोडशो केले आहेत. या बैठकींमध्ये कंपनीची आर्थिक कामगिरी, डिजिटल व्यवसायाचा विस्तार आणि भविष्यातील वाढीच्या संधी याबाबत गुंतवणूकदारांना माहिती देण्यात आली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीओशी संबंधित अंतिम कागदपत्रे सेबीकडे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठीही रोडशो आयोजित केला जाऊ शकतो. त्यामुळे जिओच्या आयपीओची अधिकृत तारीख आणि किंमतपट्टा लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
शेतात राबणार रोबोट्स, ड्रोन

चीनचा ‘गोल्ड गेम’ जगाला हादरवणार!

स्मित माछर, पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंनी दिले आमंत्रण

पाक गुप्तहेराला लष्करी माहिती देणारा नौदलाचा जवान गजाआड

जिओ प्लॅटफॉर्म्सने जून २०२६ मध्ये आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच डीआरएचपी दाखल केला होता. त्यानंतर सेबीकडून कंपनीला पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक निरीक्षणे देण्यात आली आहेत. प्रस्तावित आयपीओमध्ये कंपनीकडून सुमारे २७ कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. आयपीओनंतर जिओ प्लॅटफॉर्म्सच्या व्यवसायाचे मूल्यांकन आणि शेअरची बाजारातील किंमत याकडे देशातील तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष राहणार आहे.

दरम्यान, जिओ प्लॅटफॉर्म्सची आर्थिक कामगिरीही या आयपीओसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा १५ टक्क्यांनी वाढून ३०,०५३ कोटी रुपयांवर पोहोचला, तर महसूल १४.५ टक्क्यांनी वाढून १,४६,८८५ कोटी रुपये झाला. दूरसंचार व्यवसायासोबतच डिजिटल सेवा, क्लाऊड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एंटरप्राइज नेटवर्कसारख्या क्षेत्रांमध्ये जिओचा विस्तार सुरू आहे. त्यामुळे जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ हा केवळ रिलायन्स समूहासाठीच नव्हे, तर भारतीय भांडवली बाजारासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version