घरदेश दुनियाऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी मंत्री भारतात

ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी मंत्री भारतात

एससीओ परिषदेसाठी मसूद मलिक दाखल

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संघीय मंत्री मुसादिक मसूद मलिक यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) भारतात आगमन झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) पहिल्या ‘सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’मध्ये सहभागी होण्यासाठी ते नवी दिल्लीत आले आहेत. २२ नोव्हेंबरपर्यंत हा तीन दिवसीय दौरा असेल. २०२३ नंतर प्रथमच पाकिस्तानचे संघीय मंत्री भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतरचा हा पहिलाच असा दौरा असल्याने त्याला राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुसादिक मसूद मलिक हे पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री आहेत. पाकिस्तान सरकारने १४ नोव्हेंबर रोजी त्यांची या परिषदेसाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या निमंत्रणावरून ते भारतात आले आहेत. या परिषदेत एससीओ सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, विविध देशांमधील सांस्कृतिक वारसा, सभ्यतांमधील संवाद आणि परस्पर सांस्कृतिक समज वाढवण्यावर चर्चा होणार आहे. मलिक या परिषदेत पाकिस्तानचा दृष्टिकोन, देशाचा सांस्कृतिक वारसा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादातील योगदान मांडणार आहेत. परिषदेच्या विविध विषयांवरील सत्रांमध्येही पाकिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे या परिषदेचे उद्घाटन करतील. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी संगीत, कला, स्थापत्य, भाषा, साहित्य, हस्तलिखिते आणि तत्त्वज्ञान अशा विषयांवर चार विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड नसीम दुर्रानी चकमकीत ठार

अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!

अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!

इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी

भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या मे २०२५ मधील ऑपरेशन सिंदूरमुळे तणाव निर्माण झाला होता. मे २०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात झालेल्या एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आले होते. त्यानंतर प्रथमच पाकिस्तानचे संघीय मंत्री भारतात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version