भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापारबंदी लागू असतानाही पाकिस्तानकडून भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीत तब्बल ६९ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानने भारतातून सुमारे ५,८७६ कोटी रुपये मूल्याच्या वस्तूंची आयात केली. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत हा आकडा सुमारे ३,४७८ कोटी रुपये होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील अधिकृत व्यापार बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेच्या आकडेवारीचा हवाला देत पाकिस्तानी माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत पाकिस्तानकडून भारतात निर्यात झालेली नसल्याचेही समोर आले आहे.
पहलगाम येथे एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत व्यापारावर निर्बंध लागू केले. भारताने पाकिस्तानशी संबंधित वस्तूंच्या थेट तसेच अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली. पाकिस्ताननेही भारतासोबतचा व्यापार स्थगित करण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर मोठा परिणाम झाला. मात्र, या निर्बंधांनंतरही पाकिस्तानची भारतातून होणारी आयात वाढल्याने भारतीय वस्तू पाकिस्तानी बाजारपेठेत नेमक्या कोणत्या मार्गाने पोहोचत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा:
लडाख देशातील पहिले १०० टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश
डी.के. इट्स डन ब्रो ! कर्नाटकातील पराभवाबद्दल भाजपाकडून टोमणा
मतपत्रिकांवर झालेल्या देशातील २८ विधानपरिषद निवडणुकांत काँग्रेसला शून्य
एआय क्षेत्रातील कर्जसंकटामुळे २०० हून अधिक कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात
व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, सिंगापूर आणि श्रीलंकेतील कोलंबो यांसारख्या तिसऱ्या देशांमार्फत भारतीय वस्तू पाकिस्तानपर्यंत पोहोचत असण्याची शक्यता आहे. औषधे, रसायने, प्लास्टिक आणि औद्योगिक उत्पादनांसारख्या वस्तूंना पाकिस्तानमध्ये मागणी असल्याने पर्यायी पुरवठा मार्गांचा वापर होत असण्याचा अंदाज आहे. मात्र, आयातवाढीमागील नेमका मार्ग अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही. या घडामोडींमुळे व्यापारबंदीची अंमलबजावणी आणि तिसऱ्या देशांमार्फत होणाऱ्या संभाव्य व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या भारताच्या धोरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
