देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) भविष्यातील विस्ताराबाबत मोठे चित्र मांडले आहे. सध्याच्या व्यवसायवाढीचा वेग कायम राहिला आणि भारतीय अर्थव्यवस्था सात ते आठ टक्के दराने वाढत राहिली, तर २०३० पर्यंत स्टेट बँकेचा एकूण व्यवसाय तब्बल २०० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे २०३० मध्ये स्टेट बँकेला स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत.
जून २०२६ अखेर स्टेट बँकेचा एकूण व्यवसाय ११०.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेने यापूर्वीच १०० लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय म्हणजे ग्राहकांकडून जमा झालेल्या ठेवी आणि बँकेने दिलेली कर्जे यांचा एकत्रित आकार. सध्याच्या वाढीचा वेग पाहता पुढील काही वर्षांत बँकेच्या व्यवसायाचा आकार झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
न्यूयॉर्कमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या पंजाबच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
ट्रम्प यांची शेअर बाजारात कोट्यवधींची उलाढाल
गणेशमूर्ती पडून झालेल्या अपघातातील मृत गणेशसेवकांच्या नातेवाईकांना ५ लाख
गर्भवती सरकारी अधिकारी महिलेचा संशयास्पद मृत्यू; सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप
मात्र, २०० लाख कोटी रुपयांचा आकडा हे स्टेट बँकेने निश्चित केलेले अधिकृत लक्ष्य नसून सध्याच्या आर्थिक परिस्थिती आणि व्यवसायवाढीच्या वेगावर आधारित संभाव्य अंदाज आहे. शेट्टी यांच्या मते, अर्थव्यवस्था सात ते आठ टक्क्यांनी वाढत राहिल्यास स्टेट बँकेचा आर्थिक आकार दरवर्षी सुमारे ११ ते १२ टक्क्यांनी वाढू शकतो. या दराने वाढ कायम राहिल्यास साधारण सहा वर्षांत बँकेचा आकार दुप्पट होण्याची क्षमता आहे. त्यामुळे २०३० पर्यंत १७० ते १८० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय सहज शक्य असून, परिस्थिती अधिक अनुकूल राहिल्यास २०० लाख कोटींचा टप्पाही गाठता येऊ शकतो.
या विस्तारासाठी स्टेट बँकेने ‘व्हिजन २०३०’वर भर दिला आहे. ग्राहक, कर्मचारी, भागधारक तसेच सरकार आणि नियामक संस्था या चार प्रमुख घटकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर बँकेचा भर राहणार आहे. ग्राहकांसाठी बँकिंग सेवा अधिक सोप्या आणि वेगवान करण्याबरोबरच प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवतानाच कामाचे समाधान वाढवण्यावरही लक्ष दिले जाणार आहे.
भागधारकांसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यासाठी केवळ व्यवसाय वाढविण्याऐवजी कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण दोन ते तीन टक्के-बिंदूंनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, हा खर्चकपातीचा सरळ मार्ग नसून प्रक्रिया अधिक कार्यक्षम करून आणि उत्पादकता वाढवून खर्च नियंत्रणात आणण्याचा बँकेचा प्रयत्न असेल.
स्टेट बँकेची देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठी भूमिका आहे. देशातील एकूण बचतीपैकी जवळपास एक चतुर्थांश बचत स्टेट बँकेमार्फत जमा होत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला कर्जपुरवठा करण्यावरही बँकेचा भर कायम राहणार आहे. भविष्यात कर्जाची मागणी वाढल्यास ती पूर्ण करण्यासाठी बँकेची भांडवली स्थिती मजबूत ठेवण्याचेही उद्दिष्ट आहे.
