अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २ हजार ८ अंकांनी वधारून ७९ हजार ३१० अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ५३६ अंकांवर स्थिरावला. गुंतवणूकदारांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदीचा जोर दिसून आला. अलीकडच्या काळातील अस्थिरतेनंतर आलेल्या या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अमेरिकेतील राजकीय समीकरणांमधील या बदलामुळे पश्चिम आशियातील संघर्ष कमी होण्याची आणि शांतता चर्चेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे प्रतिबिंब अमेरिकन शेअर बाजारातही उमटले. डाऊ जोन्समध्ये ३.०३ टक्के, एस अँड पी ५०० मध्ये १.५८ टक्के, तर नॅस्डॅकमध्ये १.४४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या सकारात्मक संकेतांचा फायदा भारतीय बाजारालाही झाला.
हे ही वाचा:
व्हीलचेअरवरून जागतिक भरारी; भाविनाचा ऐतिहासिक पराक्रम!
तुमच्या पोस्टसाठी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही जबाबदार
३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!
राहुल गांधी अमेरिकेहून हिवाळी अधिवेशनात कोणता विषय आणणार?
या तेजीमागे कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण हा आणखी एक महत्त्वाचा घटक ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर जवळपास ९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९४.१२ डॉलरवर आले. भारताला आपल्या गरजेपैकी सुमारे ८५ टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्यास देशाचे आयात बिल, चालू खात्यातील तूट आणि महागाईवरील दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही भारतीय बाजारात पुन्हा खरेदीचा जोर वाढवला आहे. मागील व्यवहार सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल ७ हजार २८४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांना या खरेदीचा मोठा फायदा झाला. निफ्टी बँक निर्देशांक १ हजार ५१६ अंकांनी वधारून ५७ हजार ४२९ अंकांवर पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या समभागांमध्येही जोरदार खरेदी झाली. अवघ्या पाच तासांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ८ लाख कोटी रुपयांची भर पडली. तब्बल ५४२ दिवसांनंतर भारतीय बाजारात अशी मोठी तेजी पाहायला मिळाली. मात्र, ही तेजी टिकून राहण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी आणि कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या खाली राहणे या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
