घरबिजनेसiPhone, Mac, iPad महागणार?

iPhone, Mac, iPad महागणार?

AI च्या वाढत्या मागणीचा ऍपल ग्राहकांना बसणार फटका

- Advertisement -

ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी iPhone, Mac, iPad आणि इतर ऍपल उत्पादनांच्या किमती वाढण्याचे संकेत दिले आहेत. वाढत्या मेमरी चिप आणि स्टोरेज चिपच्या किमतींमुळे किंमतवाढ आता अटळ बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात ऍपलची उत्पादने अधिक महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल,मेटा, अमेझोन यांसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर AI डेटा सेंटर्स उभारत असून त्यासाठी प्रचंड प्रमाणात DRAM आणि NAND मेमरी चिप्सची गरज भासत आहे. यामुळे मेमरी चिप्सच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

या परिस्थितीबाबत बोलताना टीम कुक म्हणाले की, ऍपलने आतापर्यंत ग्राहकांवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून वाढलेला खर्च स्वतः उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुरवठादारांकडून होणारी किंमतवाढ इतकी मोठी झाली आहे की ती कायम सहन करणे शक्य नाही. त्यामुळे काही उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ऍपलने अद्याप कोणत्या उत्पादनांच्या किमती वाढतील किंवा किती वाढ होईल याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र उद्योग विश्लेषकांच्या मते, सप्टेंबरमध्ये लॉन्च होणाऱ्या नवीन iPhone 18 मालिकेवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसू शकतो. काही अहवालांनुसार प्रीमियम iPhone Pro मॉडेल्सच्या किमतीत २०० ते २७० डॉलर्सपर्यंत वाढ होऊ शकते. Mac आणि iPad च्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टीम कुक यांनी मेमरी चिप संकटाला “शंभर वर्षांत एकदाच येणारा पूर” अशी उपमा दिली. AI क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणावर मेमरी चिप्सचा साठा करत असल्याने ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांसाठी पुरवठा कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ऍपल आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी या जागतिक तुटवड्याचा परिणाम त्यांनाही सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा:

“जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष, तोपर्यंत व्हाईट हाऊसमध्ये भारताचा एक चांगला मित्र”

अमेरिका–इराण युद्धविरामावर अधिकृत शिक्कामोर्तब; सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी

ई-रिक्शा आणि ट्रॅक्टरच्या भीषण धडकेत सहा महिलांचा मृत्यू

इराण करार अद्याप अंतिम नाही; चर्चा फसल्यास पुन्हा बॉम्बहल्ले

दरम्यान, भारत ऍपलसाठी महत्त्वाची बाजारपेठ बनत असताना किंमतवाढीचा भारतीय ग्राहकांवरही परिणाम होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत भारतात स्थानिक उत्पादनामुळे iPhone च्या किमती तुलनेने स्थिर राहिल्या होत्या. मात्र जागतिक स्तरावरील मेमरी चिप संकट कायम राहिल्यास भारतीय बाजारातही iPhone, MacBook आणि iPad महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, AI क्रांतीमुळे निर्माण झालेल्या चिप तुटवड्याचा फटका आता थेट ग्राहकांना बसण्याची चिन्हे दिसत आहेत. ऍपलसारखी जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनीही किंमतवाढ टाळू शकत नसल्याचे टीम कुक यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version