माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला गती देण्याची आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सार्वजनिक करण्याची विनंती आपण गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना सोमवारी त्यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले, त्यावेळी भाषणात फडणवीसांनी ही विनंती अमित शहा यांना केल्याचे सांगितले.
पुणे जिल्हा परिषद कार्यालयात दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाही अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे.
मुंबईहून बारामतीकडे जात असताना २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे लिअरजेट ४५ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
अंडर-१९ आशिया चषकातील हिरो मोहित उल्वा खेळणार सौराष्ट्रकडून
कुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार
जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत
एआय पुरवठा साखळीच्या सुरक्षेसाठी ‘सॅन फ्रान्सिस्को डिक्लरेशन’वर भारताची स्वाक्षरी
या दुर्घटनेची चौकशी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) स्वतंत्रपणे करत आहेत. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, “या घटनेला आठ ते दहा महिने उलटले आहेत. मोठ्या प्रमाणावर तपास सुरू असून, विविध देशांमधील पथके आणि आंतरराष्ट्रीय संस्थाही या चौकशीत मदत करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील संभ्रम आणि शंका दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल लवकरात लवकर समोर यायला हवा.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून चौकशीला गती द्यावी, अशी वैयक्तिक विनंती आपण त्यांना केल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “नेमके काय घडले, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. हा अपघात होता की त्यामागे आणखी काही कारण होते? या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि जर ही दुर्घटना अपघातामुळे घडली असेल, तर किमान सर्वसामान्य जनतेच्या मनातील वेदना आणि प्रश्नांना तरी उत्तरे मिळाली पाहिजेत.”
शाह यांच्या हस्तक्षेपामुळे चौकशी प्रक्रियेला वेग मिळेल आणि अजित पवार यांच्या निधनाबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
