घरसंपादकीयसॅमचा सत्यनारायण झाला, की जनरल हसन?

सॅमचा सत्यनारायण झाला, की जनरल हसन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे काँग्रेसमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. मोदींनी सॅम पित्रोदा यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पित्रोदाने त्याचे प्रेमपूर्वक उत्तर दिले. एवढे पुरे नव्हते की काय, या ट्विटबाबत वृत्तवाहिन्यांनी त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या मतापासून त्यांनी फारकत घेतलेली दिसली. हे जे काही घडते आहे, त्याची पडद्या आडची कारणे वेगळीच असण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी एका बाजूला ‘बिलाँगिंग’च्या निमित्ताने त्यांच्या बाजूने वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत असताना मोदींनी त्यावर पाणी ओतले आहे. ‘मोदी औपचारीक बोलतात, डोळ्यात डोळे घालून पाहत नाहीत’, असा दावा सोनियांनी त्यांच्या आत्मचरीत्रात केलेला असताना पित्रोदांनी मोदींसाठी दयाळू, दिलदार, अशी विशेषणे उधळली आहेत. सोनिया त्यांच्या आत्मचरीत्रात मोदींबाबत काय म्हणाले, हे जेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितले तरीही पित्रोदा ठाम राहीले. ‘ते सोनियांचे मत असू शकते. प्रत्येकाचे मत वेगळे असते’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या फोन टॅपिंगच्या दाव्याबाबतही पित्रोदांनी हीच भूमिका घेतली. ‘पंतप्रधान कोणाचा फोन टॅप करत नाहीत’, असे विधान करून त्यांनी राहुल गांधी यांची गोची करून टाकली.

पित्रोदा यांच्या या नव्या अवताराचे वर्णन केवळ आश्चर्यकारक किंवा धक्कादायक या शब्दात केले जाऊ शकते. कारण मोदी ज्यांचा उल्लेख सॅमभाई असा करतात, ते केवळ काँग्रेसचे नेते नाहीत, गांधी घराण्याशी त्यांचे राजीव यांच्यापासून संबंध आहेत. ते सोनियांचे अत्यंत विश्वासू आणि राहुल गांधी यांचे मार्गदर्शक आहेत. परीवाराच्या सगळ्या ट्रस्टशी त्यांचा संबंध आहे. राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांचे नियोजन पित्रोदा यांच्याच खांद्यावर असते. लवकरच होणाऱ्या अमेरिका दौऱ्यासाठीही पित्रोदा यांनीच पुढाकार घेतलेला आहे. एका बाजूला राहुल गांधी आणि सोनिया हे दोघेही मोदींच्या नावाने दातओठ खाऊन बोलत असताना पित्रोदा यांचा सॅम अगदी सत्यनारायण झाल्यासारखा मोदींबाबत का बोलतोय, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

पित्रोदा यांच्या म्हणण्यानुसार गेल्या १२ वर्षात म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोघांमध्ये कोणताही संपर्क आणि संवाद नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मात्र एक गुजराती म्हणून दोघांचे उत्तम संबंध होते. मोदी यांचा परिचय फक्त सॅम यांच्या पुरता मर्यादीत नव्हता, पित्रोदा यांच्या पत्नी अंजली यांच्याशी सुद्धा मोदी यांचा परीचय आहे. १२ वर्षांनी अचानक नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा यांची आठवण होणे, त्यांनी पित्रोदा दांपत्याला दिवाळीच्या शुभेच्छा देणे, पित्रोदांनी त्यांचा स्वीकार करून शुभेच्छांना उत्तर देणे आणि त्यानंतर वृत्तवाहीन्यांशी बोलताना मोदींबाबत सोनिया आणि राहुल यांच्या मताशी फारकत घेऊन बोलणे, यातही कोणतीही बाब सामान्य नाही. हे का घडले असावे हे ठामपणे कुणालाच सांगता येणार नाही. पडद्या मागे नेमके काय घडले ते कुणालाही माहिती असण्याचे कारण नाही. जे काही घडले, त्याच्या दोन तीन शक्यता आहेत.

हे ही वाचा:

दिल्ली एम्समध्ये गर्भावस्थेतल्या बाळाच्या मणक्यावर ऐतिहासिक शस्त्रक्रिया

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा

जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत

भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचा आकार ९ अब्ज डॉलरच्या पुढे

पहिली शक्यता, सोनिया आणि राहुल हे दोघेही कसल्या तरी संकटात आहेत, त्यांनी पित्रोदांना मोदींसोबत संपर्क निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली. दुसरी शक्यता पित्रोदा यांच्यावर काही संकट आले आहे. तिसरी शक्यता मोदींशी पंगा घेतला तर आपले काही खरे नाही, अशी ठाम भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

गेली अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पित्रोदा यांच्याबाबतीत सतत काही ना काही वाद होत असतात. राजकीय वादांमध्ये जाण्याचे काही कारण नाही, परंतु २०२५ मध्ये थोडी वेगळीच घटना घडली. रशियातील सरकारी मीडिया स्पुटनिकमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमी सूत्रांच्या आधारे देण्यात आली होती. पित्रोदा यांचा लॅपटॉप आणि फोन इस्त्रायली गुप्तचर एजंन्सी मोसादने हॅक केल्याचे वृत्त स्पुटनिकने दिले होते. बातमी सूत्रांच्या आधाराने देण्यात आल्यामुळे त्यात मोसादशी संबंधित कोणतेही नाव नव्हते. स्पुटनिकच्या या बातमीच्या आधारे भारतातील महत्वाच्या मीडियात याबाबत सविस्तर वृत्त आले होते. हे हॅकिंग हिंडेनबर्ग- अदाणी प्रकरणाशी संबंधित असल्याचे स्पुटनिकच्या बातमीत म्हटले असल्यामुळे याबाबत भारतात काही काळ खळबळ माजली होती. प्रत्यक्षात सिद्ध काहीच होऊ शकले नाही.

दोन दिवसांपूर्वी पित्रोदा यांची जी मुलाखत झाली, त्यातही त्यांनी हेच मत व्यक्त केले आहे. ‘राहुल गांधी यांचाच नाही, माझाही फोन टॅप होतो आहे’, असे ते म्हणाले. ‘माझ्या बॅंक अकाऊंटवर नजर आहे’, असेही ते म्हणाले. परंतु याचा ठपका पंतप्रधानांवर ठेवण्यास त्यांनी नकार दिला. ‘टॅपिंग होते आहे, परंतु ते कोण करतो आहे, हे मला ठाऊक नाही. टॅपिंगमुळे मला काही फरक पडत नाही, ज्याला जे हवे आहे ते त्याला पाहू दे’, असे पित्रोदा म्हणाले आहेत.

वर्षभरापूर्वी जे काही स्पुटनिकमध्ये छापून आले होते. त्यानंतर दिवाळ सणाच्या काळात जे काही घडले, त्याचा काही परस्पर संबंध आहे काय? खरोखरच २०२५ मध्ये झालेले हॅकींग मोसादने केले होते काय? त्यात मोसादला काँग्रेसच्या युवराजांच्या संदर्भात काही घबाड मिळाले होते काय? पित्रोदा यांच्या संदर्भात काही गोपनीय आणि संवेदनशील माहिती त्यांच्या हाती लागली होती काय? धुरंधरमध्ये पाकिस्तानी जनरल शमशाद हसन सारखी त्यांची अवस्था झाली होती काय? यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदांची काही मदत केली होती काय? असे अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे मिळणे असंभव आहे.

राहुल गांधी यांच्या नियोजित अमेरिका दौऱ्याच्या आधी पित्रोदा आणि मोदी यांच्यात हा अनपेक्षित संवाद व्हावा, यातही काही दडलेले असण्याची शक्यता आहे. किंवा मोदींनी केवळ विरोधकांच्या तंबूत घबराट माजवण्यासाठी हे केले असण्याचीही शक्यता आहे.

सोनिया गांधी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात घरातील धुणी घाटावर धुण्याचा जो ओंगळवाणा प्रयत्न केला आहे, त्यातून त्यांचा आयक्यू राहुल गांधी यांच्यापेक्षा वेगळा नाही, हे बऱ्यापैकी स्पष्ट होते. हाती सत्ता होती तेव्हा हे सगळे झाकले जात होते. आता सत्तेची साथ सुटून १२ वर्षे लोटलेली आहेत. या काळात राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तिय मानले जाणारे अनेक नेते भाजपात दाखल झाले आहेत. जे उरले आहेत, त्यांचा धीर सुटत चालला आहे, ही बाब पित्रोदा यांच्या पोस्टवरून बऱ्यापैकी लक्षात येते. १२ वर्षे सत्ता नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत की, आणखी ३० वर्षे सत्ता तुम्हाला मिळत नाही. शहा म्हणाले ३० वर्षे सत्ता नाही, म्हणजे सत्ता मिळणारच नाही, असे नाही. परंतु जोपर्यंत राहुल गांधी-सोनिया गांधी यांच्या कब्जात काँग्रेस पक्ष आहे तोपर्यंत तरी सत्तेचा परीसस्पर्श होणे कठीण आहे, याची जाणीव आता गांधी घराण्याच्या निकटवर्तियांना होते आहे, एवढाच पित्रोदा यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

पित्रोदा आणि मोदी संवादाचा किंवा मोदींबाबत पित्रोदा यांनी मीडियामध्ये जी मते व्यक्त केली आहे, याचा अर्थ असा अजिबात नाही की, ते काँग्रेस सोडून भाजपाच्या तंबूत दाखल होणार. भाजपाच्या राजकारणावर त्यांनी टीकाच केली आहे. हे राजकारण देशात फूट पाडणारे आहे, हीच भूमिका त्यांनी मांडली आहे. तथाकथित सेक्युलॅरिझमचे तुणतुणे वाजवायला ते विसरलेले नाहीत.  परंतु ते मोदी यांच्या संपर्कात आहेत मोदी यांच्याबाबत त्यांच्या मनात आदर आहे, एवढीच गोष्ट सोनिया आणि राहुल यांच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. कदाचित मोदींचा उद्देशही एवढाच असावा. मोदी यांचे सरकार लवकरच कोसळणार, मोदी हे फार दिवस पंतप्रधान पदी राहणार नाहीत, असा घोषा लावणाऱ्या राहुल यांच्या शिडातील हवा काढण्याचे काम त्यांच्या तंबूत घबराट निर्माण कऱण्याचे काम मोदींच्या पोस्टने आणि पित्रोदा यांच्या मुलाखतीने नक्कीच केले आहे. हे जुळून कसे आले, याविषयावर तुर्तास विचार कऱण्याची गरज नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version