बंगालच्या उपसागरात भारत आणि म्यानमारच्या नौदलांनी संयुक्त सरावाद्वारे आपली सागरी ताकद आणि समन्वयाचे प्रदर्शन केले. दोन्ही देशांच्या युद्धनौकांनी या सरावात सहभाग घेत सागरी परिचालन क्षमता तपासल्या. तसेच, संयुक्त सागरी मोहिमांदरम्यान एकमेकांशी अधिक चांगला समन्वय साधण्याचा सराव केला.
भारत आणि म्यानमार यांच्यातील आठवा द्विपक्षीय नौदल सराव ‘इमनेक्स-२६’ची विशाखापट्टणम येथे सांगता झाली. या सरावात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस राणा’ आणि ‘आयएनएस सुमेधा’ या युद्धनौकांसह म्यानमार नौदलाच्या ‘यूएमएस किंग सिन फ्यू शिन’ या युद्धनौकेने सहभाग घेतला. हा सराव बंदर आणि सागरी अशा दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आला होता.
बंदर टप्प्यात दोन्ही देशांच्या नौसैनिकांनी एकमेकांच्या युद्धनौकांना भेटी दिल्या. विविध व्यावसायिक आणि परिचालनविषयक मुद्द्यांवर तज्ज्ञांनी विचारांची देवाणघेवाण केली. क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातूनही दोन्ही देशांच्या नौसैनिकांना परस्परांशी संवाद साधण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. एकमेकांची कार्यपद्धती आणि सागरी मोहिमांशी संबंधित प्रक्रियांची माहिती करून घेणे हा या टप्प्याचा मुख्य उद्देश होता.
यानंतर बंगालच्या उपसागरात सरावाचा सागरी टप्पा पार पडला. यामध्ये तिन्ही युद्धनौकांनी संयुक्त सागरी उपक्रम आणि परिचालन सरावात सहभाग घेतला. समन्वित सागरी हालचाली आणि सामरिक सरावांच्या माध्यमातून युद्धनौकांमधील समन्वयाची चाचणी घेण्यात आली. तसेच, संयुक्त सागरी मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. या सरावामुळे दोन्ही देशांच्या नौदलांना एकमेकांची क्षमता, कार्यपद्धती आणि सामरिक प्रक्रियांची जवळून माहिती घेता आली. ‘इमनेक्स-२६’चा आठवा टप्पा भारत-म्यानमारमधील सागरी सहकार्य वाढवण्यासोबतच प्रादेशिक सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरला.
हे ही वाचा:
श्रीगंगानगर स्फोटप्रकरणी आणखी दोन बॉम्ब जप्त
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा
घरबसल्या नोकरीच्या आमिषाने तरुणीला ९०.८ लाखांचा गंडा
आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल
‘महासागर’ संकल्पनेला बळ
हा सराव भारताच्या ‘महासागर’ संकल्पनेशी आणि ‘शेजारी प्रथम’ धोरणाशी सुसंगत आहे. ‘महासागर’ म्हणजे विविध क्षेत्रांतील सुरक्षेसाठी आणि विकासासाठी परस्पर सहकार्य व सर्वांगीण प्रगती साधण्याची संकल्पना. या माध्यमातून भारत आपल्या सागरी शेजारी देशांसोबतचे सहकार्य अधिक मजबूत करत आहे.
