घरक्राईमनामाछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडील ४.२९ कोटींचे सोने, २४ लाखांची रोकड जप्त

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडील ४.२९ कोटींचे सोने, २४ लाखांची रोकड जप्त

नक्षलवाद्यांच्या आर्थिक जाळ्यावर घाव

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांनी जंगलात जमिनीखाली लपवून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा खजिना जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ४ कोटी २९ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या लगडी आणि २४ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. इंद्रावती नदी परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांनी मौल्यवान वस्तू लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर जिल्हा राखीव दल (डीआरजी), भैरमगड पोलीस आणि बॉम्ब शोध व नाशक पथकाने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली.

शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना जमिनीखाली पुरलेला एक स्टीलचा डबा आढळून आला. परिसरात नक्षलवाद्यांकडून स्फोटके किंवा भूसुरुंग पेरलेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन बॉम्ब शोध पथकाने आधी सुरक्षिततेची तपासणी केली. त्यानंतर डबा उघडण्यात आला. त्यामध्ये प्रत्येकी १० तोळे वजनाच्या सोन्याच्या ३३ लगडी आढळल्या. या सोन्याचे एकूण वजन ३३० तोळे म्हणजेच सुमारे ३.८४ किलोग्रॅम आहे. त्याची बाजारातील अंदाजित किंमत ४ कोटी २९ लाख रुपये असून, त्यासोबत २४ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकडही सापडली.

हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का

आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

ही कारवाई २७ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. बीजापूरचे पोलीस अधीक्षक उमेश प्रसाद गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रविंद्र कुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. जप्त करण्यात आलेले सोने आणि रोकड माओवादी संघटनेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संपत्तीचा स्रोत काय आहे आणि ती नेमकी कोणाच्या ताब्यात होती, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, बीजापूर जिल्ह्यातील विविध नक्षली तळांवर केलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत ८ कोटी २४ लाख रुपयांहून अधिक रोकड आणि १२.३४ किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाईत त्यांच्या शस्त्रसाठ्यासोबतच आर्थिक स्रोतांवरही सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक रसद आणि संघटनेचे व्यवहार उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version