जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात बंदी घातलेल्या ‘इत्तेहाद-उल-मुस्लीमीन’ या संघटनेशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या नेटवर्कला सीमेपलीकडून निधी मिळत असल्याचा पोलिसांना संशय असून, कथित आर्थिक व्यवहार, गुप्त बैठका आणि संघटनेच्या विचारसरणीचा प्रसार यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलम १० आणि १३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बांदीपोरा आणि आसपासच्या परिसरात या कथित नेटवर्कशी संबंधित १४ ते १५ गुप्त बैठका झाल्या होत्या. त्यापैकी पाच ते सहा बैठका बांदीपोरा-बारामुल्ला मार्गावरील एका छोट्या हॉटेलमध्ये झाल्याचा संशय आहे. या बैठकांचा उद्देश, त्यामध्ये सहभागी व्यक्ती आणि संघटनेच्या कथित हालचालींमधील त्यांची भूमिका यांचा तपास केला जात आहे. या प्रकरणात मुबीना बानो, वहीद अहमद भट, खुशबू जान, महक जान, आलिया जान आणि इरफान अहमद रेशी ऊर्फ रईस या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय कुपवाडा जिल्ह्यातील एका धार्मिक उपदेशकाची आणि दोन संशयित कुरिअरची भूमिका तपासाच्या कक्षेत आहे.
तपासादरम्यान एका वर्षाहून अधिक काळात सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आल्याचे वृत्त आहे. यापैकी सुमारे २.२६ लाख रुपये बांदीपोरा जिल्ह्यातील दाचीगाम येथील मुबीना बानो हिच्या जम्मू-काश्मीर बँकेतील खात्यात जमा झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. उर्वरित रक्कम रोख स्वरूपात पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे.
हे ही वाचा:
दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक
बंगालच्या उपसागरात भारत-सिंगापूरचा संयुक्त ‘सिम्बेक्स’ युद्धाभ्यास
अमली पदार्थ तस्करीच्या ‘डेथ ट्रायंगल’वर प्रहार
विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’
पोलिसांच्या दाव्यानुसार, या पैशांपैकी काही रक्कम कथित नेटवर्कमधील सहकाऱ्यांमध्ये वाटण्यात आली, तर काही रक्कम वहीद अहमद भट याच्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे. या निधीचा मूळ स्रोत, तो कोणामार्फत पाठवण्यात आला आणि त्याचा नेमका वापर कशासाठी झाला, याचा तपास सुरू आहे.
