घरक्राईमनामाआई-वडिलांशी वादानंतर नवव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न

आई-वडिलांशी वादानंतर नवव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न

अँटॉप हिल पोलिसांच्या तत्परतेमुळे २१ वर्षीय तरुणाचा जीव वाचला

आई-वडिलांशी झालेल्या वादानंतर नैराश्यातून नवव्या मजल्यावरील इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या २१ वर्षीय तरुणाचे प्राण अँटॉप हिल पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत तरुणाशी शांतपणे संवाद साधला. त्याला धीर देत त्याचे मन वळवण्यात यश मिळवले आणि त्याला सुखरूप खाली उतरवले. त्यानंतर तरुणासह त्याच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास अँटॉप हिल पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षाकडून तातडीचा संदेश प्राप्त झाला. बंगाली पुरा परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवर एक तरुण उभा असून तो आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस हवालदार अमित खंदारे, भानुदास चव्हाण आणि निकम यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
हे ही वाचा:
डोंगरीत सव्वा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

आझम खान यांच्या जौहर विद्यापीठावर ईडीची कारवाई

“प्रत्येक गोष्टीत राजकारण करु नका”

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

घटनास्थळी पोहोचल्यानंतर नऊ मजली इमारतीच्या गच्चीच्या टोकावर एक तरुण उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. प्राथमिक चौकशीत आई-वडिलांशी झालेल्या घरगुती वादानंतर तो टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समोर आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणतीही घाई न करता अत्यंत संयमाने त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याला धीर देत समजावून सांगितले आणि त्याचे मन वळवण्यात यश मिळवले. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला गच्चीच्या टोकावरून सुरक्षितपणे खाली उतरवले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अनर्थ टळला.

घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुण आणि त्याच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी संवाद साधत परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संयम आणि प्रसंगावधान यांचे परिसरातून कौतुक होत आहे. पोलीस उपआयुक्त अनुराग जैन, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version