नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात इम्तियाज जलील यांच्याविरोधात पुरावे आढळल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाच्या तपासादरम्यान मतीन पटेल यांच्या मोबाईल फोनमध्ये काही संभाषणांच्या रेकॉर्डिंग आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे इम्तियाज जलील यांच्या कथित सहभागाची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी जलील यांचा जबाबही नोंदवला असून त्यांचा आवाज नमुनाही घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या रेकॉर्डिंगमधील आवाज आणि इतर पुराव्यांची तपासणी एसआयटीकडून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
हरमीत कौर ढिल्लन यांचा अमेरिकेच्या सहाय्यक ऍटर्नी जनरल पदाचा राजीनामा
पश्चिम बंगालमध्ये १,१५० जिलेटिन कांड्या, ९८९ डेटोनेटर्ससह २१ शस्त्रे जप्त
आशुतोष रांका, सौरव दासची गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचा डंका
दरम्यान, निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेल यांच्यावर झाला होता. पोलिसांच्या तपासानुसार, निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना पटेल यांनी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. चौकशीदरम्यान निदाच्या ठावठिकाणाबाबत विचारले असता पटेल यांनी वारंवार इम्तियाज जलील यांचे नाव घेतल्याचा उल्लेख यापूर्वी दाखल झालेल्या आरोपपत्रातही करण्यात आला होता.
