बिहार दक्षता विभागाने बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीअंतर्गत एका प्रशासकीय अधिकारी असलेल्या दाम्पत्याच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करत १ कोटी रुपयांहून अधिक रोकड, मौल्यवान दागिने, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि ४८ महागडी घड्याळे जप्त केली आहेत. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या वॉरंटनंतर करण्यात आली.
ही छापेमारी पाटणाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (पुरवठा) रवींद्र कुमार दिवाकर आणि त्यांच्या पत्नी दानापूरच्या जिल्हा उपनिबंधक कुमारी स्वीटी यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली. पाटणा आणि बेगुसराय येथील अनेक ठिकाणी एकाच वेळी दक्षता विभागाच्या पथकांनी छापे टाकले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान मालमत्ता, बँक खाती, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, रोकड तसेच दागिने ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी घटनास्थळी विशेष मशीनही आणण्यात आली होती.
दक्षता विभागाच्या पथकाने जप्त केलेली रोकड, दागिने आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली. या संपूर्ण कारवाईवर दक्षता विभागाचे महासंचालक (DG) जितेंद्र सिंह गंगवार यांनी देखरेख ठेवली आणि ते स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. दिवाकर यांच्या बेगुसराय जिल्ह्यातील पोखरिया येथील वडिलोपार्जित घरावरही सहा सदस्यांच्या पथकाने छापा टाकला. याशिवाय दानापूरमधील नाहर रोड येथील त्यांच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
हे ही वाचा:
एंटीलिया प्रकरण झाकण्याचे प्रयत्न होत आहेत का?
तिरंदाजीत भारताची सुवर्णहॅट्ट्रिक
सचिन वाझेच्या जामिनाला अंतरिम स्थगिती
रोकड, दागिने आणि घड्याळांचा मोठा साठा
छापेमारीत सापडलेल्या रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची नेमकी एकूण किंमत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार पाटण्यातील ठिकाणी ५०० रुपयांच्या नोटांचे १०० हून अधिक बंडल सापडले. त्यांची एकूण किंमत सुमारे ७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सुमारे ६ लाख रुपये किमतीची ४८ घड्याळेही आढळून आली.
बेगुसराय येथील ठिकाणी सुमारे ९ लाख रुपये रोकड, तसेच सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने जप्त करण्यात आले. दोन्ही ठिकाणांहून स्थावर मालमत्ता आणि आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रेही मिळाली.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पाटण्यातील फ्लॅटमधून ७०.५३ लाख रुपये, तर बेगुसरायमधून ९.४४ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणांहून मिळालेल्या सोन्या, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची प्राथमिक किंमत अनुक्रमे २३.८९ लाख रुपये आणि २८.७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दिवाकर यांनी पाटण्यात दोन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी सुमारे १.०७ कोटी रुपये खर्च केल्याचे तपासात समोर आले आहे. हे दोन्ही फ्लॅट त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहेत. याशिवाय पाटण्यात सुमारे १.२८ कोटी रुपयांना तीन भूखंड खरेदी करण्यात आले. हे भूखंड दिवाकर यांच्या वडिलांच्या आणि पत्नीच्या नावावर नोंदवण्यात आले आहेत. दक्षता विभागाने जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली असून, त्यानंतर या दाम्पत्याकडे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेचे नेमके प्रमाण निश्चित केले जाणार आहे.
दक्षता विभागाच्या महासंचालकांनी सांगितले की, दिवाकर, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असलेल्या अनेक मालमत्तांची तपासणी सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्वीटी यांच्या नावावर दानापूरमध्ये सुमारे ४९.३४ लाख रुपये किमतीचा फ्लॅट आहे. त्याच परिसरातील दिवाकर यांच्या नावावरील दुसऱ्या फ्लॅटची किंमत सुमारे ४५.६८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या दाम्पत्याच्या नावावर फुलवारी शरीफमध्ये प्रत्येकी ३.९ दशांश भूखंड असल्याचे तपासात समोर आले आहे. स्वीटी यांच्या नावावर असलेल्या भूखंडाची किंमत सुमारे ५१.७३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाकर यांच्या नावावरील समान आकाराच्या भूखंडाची किंमतही जवळपास तेवढीच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
