घरक्राईमनामाबेल्जियममधून येणाऱ्या ‘कन्व्हर्जन फंडिंग’चा पर्दाफाश

बेल्जियममधून येणाऱ्या ‘कन्व्हर्जन फंडिंग’चा पर्दाफाश

५.१० कोटींच्या परदेशी निधी प्रकरणी जैसलमेरमध्ये छापे

- Advertisement -

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या निधीच्या कथित गैरवापराचा तपास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केला आहे. बेल्जियमस्थित एका संस्थेकडून जैसलमेरमधील दोन व्यक्तींना सुमारे ५.१० कोटी रुपये मिळाल्याचे ईडीच्या तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. या निधीचा कथितपणे घोषित उद्देशापेक्षा वेगळ्या कामांसाठी वापर झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

ईडीच्या जयपूर विभागीय कार्यालयाने शनिवारी जैसलमेरमधील २ ठिकाणी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा), १९९९ अंतर्गत झडती घेतली. जैसलमेरमधील देऊ राम आणि त्यांचा सहकारी ज्ञानचंद यांना बेल्जियमस्थित ‘अमर एएसबीएल’ या संस्थेकडून हा निधी मिळाल्याचे ईडीने म्हटले आहे. संबंधित संस्थेने स्वतःला ब्रुसेल्सस्थित स्वयंसेवी संस्था म्हणून घोषित केले आहे.

माहितीनुसार, हा निधी शैक्षणिक सेवा, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम तसेच कुटुंबाच्या देखभालीसाठीच्या रकमेच्या स्वरूपात दाखवून भारतात आणण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या निधीचा वापर घोषित कारणांसाठी झाला नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. देऊ राम यांनी या निधीतून सुमारे २.६० कोटी रुपये रोख स्वरूपात काढल्याचेही तपास यंत्रणेने म्हटले आहे. तसेच निधीच्या प्राप्ती आणि वापराबाबत योग्य हिशोब किंवा आर्थिक नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

तपासानुसार, ‘अमर एएसबीएल’ गेल्या १४ ते १५ वर्षांपासून जैसलमेरमध्ये कार्यरत आहे. मात्र, भारतात या संस्थेच्या नावाने नोंदणीकृत ट्रस्ट किंवा स्वयंसेवी संस्था नसल्याचे ईडीने नमूद केले आहे. संस्थेकडून जैसलमेरमध्ये शैक्षणिक मदतीच्या नावाखाली निधी दिला जात असल्याचे सांगितले जाते. तपासादरम्यान परदेशी निधीचा वापर वैयक्तिक खर्चासाठी तसेच दुर्बल घटकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विचारांवर प्रभाव टाकण्यासाठी झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच संबंधित व्यक्ती आणि बेल्जियममधील संस्थेच्या प्रतिनिधींमध्ये नियमित संपर्क असल्याचेही तपासात आढळल्याचे ईडीने म्हटले आहे.

हे ही वाचा:

काश्मीर प्रश्नात एर्दोगान यांची पुन्हा लुडबूड

एनएसईने आणला शेअर निवडीचा ‘लेन्स’

नाशिकमध्ये ‘ज्ञानकुंभ’ विद्वत संगोष्ठीचे आयोजन

तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराणमध्ये तीन तास चर्चा

दरम्यान, बँकांनी देऊ राम आणि ज्ञानचंद यांच्या खात्यांमध्ये पुढील परदेशी रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर संबंधित निधी इतर व्यक्तींच्या बँक खात्यांमार्फत वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही ईडीने केला आहे. झडतीदरम्यान ईडीने विविध कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, परदेशातून आलेल्या निधीचा प्रत्यक्ष वापर कशासाठी झाला, याचा तपास ईडीकडून केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version